पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा लाभ घ्या – ना. संजय बनसोडे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा लाभ घ्या - ना. संजय बनसोडे
उदगीर (एल. पी. उगिले) : महाराष्ट्र शासन हे लोककल्याणकारी शासन असल्यामुळे कित्येक लोककल्याणकारी योजना सुरू करत आहे. त्या योजनाचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा, आणि कार्यकर्त्यांनी त्या योजनांची सविस्तर माहिती सर्वसामान्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचवावी. असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप्स योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी 100 कोटी रुपये इतकी निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे. सुमारे 500 स्टार्टअप्सना एक लाख ते पंचवीस लाखापर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. तरी या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील इच्छुक महिला स्टार्टअप्सनी 5 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत, असेही आवाहन ना. संजय बनसोडे यांनी केले आहे.
लोककल्याणकारी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वच घटकांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. महिलांसाठी, तरुणांसाठी, बेरोजगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी, उद्योजकांसाठी त्या योजनांची माहिती घेऊन कार्यकर्त्यांनी लाभार्थ्यापर्यंत माहिती पोहोचवावी. असेही ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप्स योजना ही महाराष्ट्र राज्यातील होतकरू महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे, राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करण्यासाठी एक वेळेस अर्थसहाय्य करणे, राज्यातील महिला स्टार्टअप्सना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे व देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील स्टार्टप्स परिसंस्थेच्या विकासासाठी, नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी अंतर्गत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या दृष्टीने सर्व विभागातील महिलांनी याचा लाभ घ्यावा. असेही आवाहन ना. संजय बनसोडे यांनी केले आहे.
