‘मैत्री’ प्रशिक्षणांमधून पशुपालक हित जपण्याबरोबरच बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगार निर्मिती शक्य : डॉ. नानासाहेब कदम

0
'मैत्री' प्रशिक्षणांमधून पशुपालक हित जपण्याबरोबरच बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगार निर्मिती शक्य : डॉ. नानासाहेब कदम

'मैत्री' प्रशिक्षणांमधून पशुपालक हित जपण्याबरोबरच बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगार निर्मिती शक्य : डॉ. नानासाहेब कदम

उदगीर (एल.पी.उगीले) : ‘मैत्री’ प्रशिक्षणांमधून कौशल्यवृद्धी करून पशुपालकांचे हित साधण्या बरोबरच ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांकरिता स्वयंरोजगार निर्मिती शक्य असल्याचे प्रतिपादन लातूरचे पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. नानासाहेब कदम यांनी केले. ते ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर; पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पशुप्रजनन व स्त्रीरोगशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर येथे आयोजित ‘ग्रामीण भारतासाठी बहुउद्देशीय कृत्रिम रेतन तंत्रज्ञ’ (मैत्री) प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील प्रशिक्षण कार्यकमाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोपाळ भारकड तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रवीणकुमार घुले, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त नांदेड, डॉ. सुनील बळवंतकर, पशुधन विस्तार अधिकारी आणि डॉ.अनिल पाटील, प्रकल्प सह-समन्वयक उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. गोपाळ भारकड यांनी तरुणांनी प्रशिक्षण कालावधीत महाविद्यालयातील तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा उपयोग शेतकरी कल्याण आणि पशुसंवर्धन विभागाच्या बळकटी करणासाठी करण्याचे आवाहन केले. डॉ. अनिल पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये दि.२९ जुलै ते २७ ऑगस्ट २०२४ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये नांदेड व लातूर जिल्ह्यातील ३० सुशिक्षित बेरोजगार तरुण सहभागी झाले असल्याचे सांगितले. महाविद्यालयात त्यांना एक महिना विविध व्याख्यानासह जनावरांमधील कृत्रिम रेतन विषयक प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. डॉ. प्रवीणकुमार घुले यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना पशुपालकांच्या गोठ्यापर्यंत सर्व पशुवैद्यकीय सेवा उत्तम प्रकारे पोहचवण्यासाठी या प्रशिक्षणामधून कुशल व तांत्रिक मनुष्यबळ तयार करणे हे या प्रशिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. सुनील बळवंतकर यांनीही प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षण सह-समन्वयक डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रशिक्षण समन्वयक डॉ.स्नेहल रामटेके यांनी केले. यावेळी डॉ.अशोक भोसले आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!