शासकीय रुग्णालयातील प्रसूती गृहाला गळती, बाळ बाळंतिणीचे आरोग्य धोक्यात – उषा कांबळे
शासकीय रुग्णालयातील प्रसूती गृहाला गळती, बाळ बाळंतिणीचे आरोग्य धोक्यात - उषा कांबळे
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर येथील शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये प्रसूती गृहाच्या इमारतीला गळती लागल्याने संपूर्ण वार्ड कोंदट बनला आहे. त्यामुळे बाळ आणि बाळंतीण यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. शासनाच्या वतीने या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा माजी नगराध्यक्ष उषाताई कांबळे यांनी एका निवेदनाद्वारे आरोग्य विभागाला दिला आहे. काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने प्रत्यक्ष पाहणी करून शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास सदरील बाब आणून दिली असून प्रसूती गृहातील बाळंतिणीची चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मंजूर खा पठाण, किसान सेलचे नाना ढगे, माजी नगरसेवक महबूब शेख, वर्षाताई गायकवाड, संतोष वळसणे, माजी नगरसेवक रेखाताई कानमंदे इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाचे निवेदन डॉ. देशपांडे यांच्यावतीने देण्यात आले.
उदगीरच्या शासकीय रुग्णालयाला सामान्य रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला आहे. शासनाच्या वतीने दर्जा जरी वाढवला असला तरी सुविधांचा प्रचंड अभाव आहे. कर्मचारी वर्ग ही अपुरा आहे. या गोष्टीचे गांभीर्य शासनाने विचारात घ्यावे, कारण उदगीर हे आंध्र, कर्नाटका, तेलंगणा आणि महाराष्ट्र या चार राज्याच्या सीमेवर असून या रुग्णालयामध्ये सीमा भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात, विशेष करून महिला रुग्णांसाठी हे शासकीय रुग्णालय प्रसिद्ध असले तरी शासकीय सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. याची जाणीव प्रशासनाने ठेवावी अशी ही मागणी काँग्रेसच्या नेत्या उषाताई कांबळे यांनी केली आहे.
