प्रतिबंधित गुटख्याच्या विक्री आणि वाहतुकीकडे कानाडोळा !! पोलीस दादाला मिळत असेल का लोण्याचा गोळा ?
प्रतिबंधित गुटख्याच्या विक्री आणि वाहतुकीकडे कानाडोळा !! पोलीस दादाला मिळत असेल का लोण्याचा गोळा ?
उदगीर (एल पी उगिले) : संपूर्ण उदगीर तालुक्यात गावोगावी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखू राजरोसपणे विक्री होत आहे. कायदेशीर बाबीत या संदर्भात कारवाई करण्याचे सर्वस्व अधिकार अन्न व भेसळ विभागाला असल्याचे सांगत, पोलीस प्रशासनाकडून हात वर केले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात गुटख्याच्या व्यवहारात पोलीस दलातील काही कर्मचारी चांगलेच रमलेले आहेत. अशी चर्चा प्रत्येक चौका चौकातून होत आहे.
अवैध धंद्याचे माहेरघर बनत असलेल्या उदगीर तालुक्याची पार्श्वभूमी विचारात घेतल्यास हा भाग आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका आणि महाराष्ट्र या चार राज्याच्या सीमेवर असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला, मात्र शेजारच्या राज्यात सहज उत्पादित होणारा आणि विक्री होणारा गुटखा, सुगंधित तंबाखू महाराष्ट्रामध्ये तोगरी मार्गे खुल्लम खुल्ला येते. आणि गंमत म्हणजे पोलीस प्रशासनातील काही झारीतले शुक्राचार्य या वाहतुकीसाठी सहकार्य करत असतात, असेही पोलीस प्रशासनातीलच काही कर्मचारी उघडपणे बोलतात. याचाच अर्थ पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा उदगीर परिसरात, शहरात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खरेदी, विक्री, वाहतूक केला जात आहे.
महाराष्ट्रातील युवा पिढी तंबाखूच्या व्यसनाधीन होऊ नये, कॅन्सर सारख्या गंभीर स्वरूपाच्या आजाराला बळी पडू नये. अशा उदात्त हेतूने कोट्यावधीचा कर बुडाला तरी हरकत नाही. मात्र तरुणांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. असे वाटल्यामुळे शासनाच्या वतीने गुटखा आणि सुगंधित तंबाखू वर बंदी घालण्यात आली. मात्र ही बंदी घातल्यानंतर अत्यंत चाणाक्ष असलेल्या अवैध धंद्यातील शिलेदारांनी सीमा भागात आपले कारखाने टाकून महाराष्ट्रामध्ये तो माल सहज विकता येईल म्हणून पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आपले धंदे गतिमान केले आहेत. शासनाने बंदी जरी घातली असली तरी सहज उपलब्ध होणारा मात्र ज्यादा पैसे घेऊन विकला जाणारा गुटखा आणि सुगंधित तंबाखू उदगीर परिसरातून इतर ठिकाणी पोहोचता केले जाते, असे इतर विभागातील पोलीस प्रशासनाला वाटू लागले आहे. मागील काळात पुणे पोलिसांनी दोन वेळा उदगीर येथील गुटख्याच्या गोडाऊन वर धाडी टाकून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला होता. इतकेच नव्हे तर तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन यांच्या पथकाने देखील अनेक वेळा धाडी टाकून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला होता.
एक वेळा नांदेड पोलिसांनीही उदगीर येथे धाड टाकून गुटखा जप्त केला होता. हे सर्व प्रकार पाहिल्यानंतर उदगीर तालुक्यातील जनतेला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की, जी गोष्ट नांदेड पोलिसांना कळते, पुणे पोलिसांना कळते, लातूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कळते, ती गोष्ट उदगीरच्या स्थानिक पोलिसांना कशी कळत नसेल? की त्यामागे वेगळेच काही गौडबंगाल आहे. याचा शोध घेणे गरजेचे आहे. उदगीर शहरातून खाजगी ट्रॅव्हल्स च्या माध्यमातून गोणीच्या गोणी भरून पुण्याला नियमितपणे मोठ्या प्रमाणात गुटखा जात होता, हे पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उदगीर येथे येऊन धाडी टाकल्या होत्या. याचाच अर्थ महाराष्ट्रातील मोठमोठ्या शहरांना उदगीर मधून गुटखा पुरवला जातो, मग उदगीर शहर असेल किंवा ग्रामीण असेल येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी काय करत असतील? हाही प्रश्न जनतेला पडणे स्वाभाविक आहे. अवैध गुटखा, मटका, जुगार हे सगळे राजरोसपणे चालत असताना पोलीस प्रशासनाच्या वतीने म्हणावे त्या गतीने का कारवाई केली जात नसावी? प्रसिद्धी माध्यमाने उठाव केल्यानंतर किंवा काही सामाजिक संस्थांनी, राजकीय पक्षांनी निवेदने दिल्यानंतर थातूरमातूर कारवाई करून आपण भरपूर काही केले, असे दाखवण्यात काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पटाईत झाले आहेत. खैर इतर अवैध धंदे वेगळे आणि गुटख्यासारखा प्रकार जो तरुणांच्या आरोग्यावर घाला घालतो, सामाजिक आरोग्यावर घाला घालतो. त्याचा बाजार होणे हे निश्चित चुकीचे आहे. आणि ते थांबले पाहिजे, या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संतोष नागरगोजे यांनी आणि जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी अन्न व भेसळ प्रतिबंधक उपायुक्तांना निवेदन देऊन तुम्हाला माहित नसतील तर आम्ही तुम्हाला गुटख्याचे गोडाऊन दाखवतो, आठवड्यातून चार ते पाच वेळा येणाऱ्या ट्रकची माहिती देतो, तुम्ही त्याच्यावर कारवाई करता का? असा प्रश्न उपस्थित केला होता. इतकेच नाही तर केवळ मनुष्यबळ कमी आहे, असे कारण सांगून कोणत्याही कारवाईमध्ये दिरंगाई करणाऱ्या अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचा निषेधही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला होता.
इतके सारे झाले तरी ना पोलीस प्रशासनाला जाग आली, ना अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाला जाग आली! सर्व व्यवहार जैसे थे पूर्ववत चालू आहेत.
गुटख्याचा धंदा इतक्या राजरोसपणे तरी चालू नये, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांची आहे. आणि त्या दृष्टीने प्रशासनाला वेळोवेळी कळविण्यात हे आले आहे. मात्र प्रशासन या संदर्भात उदासीन भूमिका का घेत आहे? हे कळायला मार्ग नाही. काही दिवसापूर्वी निकेतन कदम नावाचे आयपीएस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून आले होते. त्यांनी जिल्हाभर अवैध धंद्याचा कर्दनकाळ म्हणून काम केले. अनेक मोठमोठ्या धाडी टाकल्या. अवैध धंद्यावर अंकुश ठेवला. मात्र त्यांची बदली होतातच पुन्हा बिनधास्तपणे सर्व काही अल्बेल आहे, अशा थाटात अवैद्य धंदे चालू आहेत. त्याच्यावर कोणाचेही बंधन नाही की काय? अशी शंका येणे इतपत हे धंदे जोर धरू लागले आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनला गुन्हे प्रकटीकरण शाखा असते, आणि ती शाखा गुंतागुंतीचे गुन्हे शोधत शोधत कोणते गुन्हे होऊ नयेत, किंवा समाज घातक कोणत्या गोष्टी होऊ नयेत. या दृष्टीनेही काम करत असते. मात्र उदगीर तालुक्यात या शाखेला कोणते वेगळेच काम दिले की काय? अशी शंका आता येऊ लागली आहे. खैर बाकी काही असो गुटख्याचा मोठ्या प्रमाणात मांडलेला बाजार तरी कमी व्हावा आणि गुन्हेगारावर कारवाई व्हावी. अशी अपेक्षा जनता व्यक्त करू लागली आहे.
