सर्वसामान्यांच्या वेदनांना आवाज अण्णाभाऊ साठे – डॉ मारोती कसाब
सर्वसामान्यांच्या वेदनांना आवाज अण्णाभाऊ साठे - डॉ मारोती कसाब
अहमदपूर (गोविंद काळे) : लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी सर्वप्रथम वास्तववादी साहित्य जगासमोर मांडलं आणि या साहित्यातून सर्वसामान्यांच्या वेदनांचा आवाज सरकार पर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्रा. डॉ. मारोती कसाब यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे होते तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा.डॉ. कांतराव जाधव,प्रा. डॉ. गोरोबा रोडगे व डॉ. मारोती कसाब यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमाप्रसंगी पुढे बोलतांना डॉ. मारोती कसाब म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी फार मोठे योगदान दिले आणि सिंहगर्जना केली की, ‘ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’ यावेळी इंग्रजांना पळता भुई थोडी झाली. तसेच अखंड महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी फार मोठे योगदान दिले तसेच त्यांचं साहित्य जगभर प्रसिद्ध आहे त्या साहित्यातून त्यांनी मानवी जीवनाचे वास्तववादी चित्रण केले , असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ पांडुरंग चिलगर यांनी केले व सूत्रसंचालन प्रो. डॉ. अनिल मुंढे यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , कार्यालयीन कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
