महसूल पंधरवाडाची हेर येथुन सुरुवात – सुशांत शिंदे
महसूल पंधरवाडाची हेर येथुन सुरुवात - सुशांत शिंदे
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील हेर येथे महसूल दिन साजरा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे आणि तहसीलदार राम बोरगावकर यांच्या उपस्थितीत एक विशेष कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार राम बोरगावकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, पेन व अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा कादंबरी देऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी महसूल पंधरवडा साजरा करण्याच्या महत्त्वा बाबत आणि त्याच्या उपक्रमांबद्दल उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे आणि तहसीलदार राम बोरगावकर यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन, स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, कृषी मार्गदर्शन, शेती पाऊस आणि दाखले, युवा संवाद, महसूल जनसंवाद, महसुली ई प्रणाली, सैनिक हो तुमच्यासाठी, आपत्ती व्यवस्थापन, ये खात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणासाठी इत्यादी कार्यक्रम १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या पंधरवडा मध्ये साजरे करण्याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सारिका सूर्यवंशी होत्या.या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कार्यांचा आढावा घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी महसूल पंधरवाडा दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला, आणि महसूल विभागाच्या कार्यप्रणाली विषयी माहिती दिली. मंडळ अधिकारी पंडित जाधव यांनी महसूल संबंधित तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या. तलाठी सावन उळागड्डे, अंकुश वडगावे आणि अनुराधा अलगुले यांनी महसूल विभागातील विविध कामांची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या सरपंच सारिका सूर्यवंशी यांनी महसूल विभागाच्या कार्यात गावकऱ्यांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना महसूल पंधरवाडा अंतर्गत होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार राम बोरगावकर यांनी दिली.
या कार्यक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये महसूल विभागाच्या कार्यप्रणालीबद्दल जागरूकता वाढली आहे. यावेळी मंडळ अधिकारी पंडित जाधव, ग्रामविकास अधिकारी बाबुराव मुसळे,तलाठी सावन उळागड्डे, करडखेलचे तलाठी अंकुश वडगावे, डिग्रस च्या तलाठी अनुराधा अलगुले,लिपीक विलास कांबळे, पोलीस पाटील एकनाथ कसबे, आदर्श शेतकरी बाबासाहेब पाटील, उपसरपंच तुळशीराम बेंबडे, चेअरमन संगमेश्वर मिटकरी, सामाजिक कार्यकर्ते अविनाश सूर्यवंशी, बालविकास व प्रकल्प अधिकारी आशा सूर्यवंशी, धनाजी माटेकर, उदगीर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सर्व अंगणवाडी कार्यकर्ते उपस्थित होत्या. माझी लाडकी बहीण योजनेचे जयाबाईची वाडी येथील काम शंभर टक्के पूर्ण केल्याबद्दल अंगणवाडी कार्यकर्ती उषा देवकते तसेच हेर येथील आदर्श शेतकरी बाबासाहेब पाटील यांचा तहसीलदार राम बोरगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक मंडळ अधिकारी पंडित जाधव यांनी केले तर आभार तलाठी सावन उळागड्डे यांनी मानले.
