वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी – जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे
वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी - जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे
लातूर (एल.पी.उगीले) : पोलीस व वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात श्रमदानातून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न झाले.वृक्ष लागवड अन् संवर्धन ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. वृक्षांची चळवळ ही सर्वसमावेशक चळवळ असून, आपण झाडांकडून प्रत्येक व्यक्ती मोफत ऑक्सिजन घेतो. त्यामुळे वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले. वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात श्रमदानातून वृक्षारोपण उपक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.
वसुंधरा प्रतिष्ठान व लातूर पोलिसांच्या तर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी सकाळी अर्जुन, करंज, चाफा, जास्वंद, बदाम, बकुळ, तुळस, आदींसह फुलांच्या झाडांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण उपक्रम साठी वसुंधरा प्रतिष्ठान व लातूर पोलिसांच्या टीमने मागील 2 दिवसांत खड्डे करून घेतले. शुक्रवारी सकाळी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, भरोसा सेलचे सहायक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांनी श्रमदानात सहभाग घेत उत्साह वाढविला. त्यांच्या उपस्थितीत कार्यालयाच्या परिसरात या विविध झाडांची लागवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी आणि अमलदारांच्या हस्ते प्रत्येकी एक झाड लावण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील, पोलीस अमलदार रियाज सौदागर, भरोसा सेलचे महिला व पुरुष पोलीस अमलदार, वसुंधरा प्रतिष्ठानचे प्रा.योगेश शर्मा, रामेश्वर बावळे, अमोल आप्पा स्वामी, ॲड.अजित चिखलीकर, राहुल माशाळकर, उमेश आप्पा ब्याकोडे, गौसपाशा मणियार, वैभव वाघ, प्रशांत मसलगे आदींनी सहभाग घेतला.
उपस्थित पोलीस अमलदारांना प्रत्येकी एका झाडाची काळजी घेऊन झाडांना वाढवावे असे आवाहन पोलिस अधीक्षक यांनी केले.
