कर्तव्यनिष्ठ, कर्मनिष्ठ विद्यार्थी प्रिय शिक्षक- प्रा.प्रभाकर बाभुळगांवकर
कर्तव्यनिष्ठ, कर्मनिष्ठ विद्यार्थी प्रिय शिक्षक- प्रा.प्रभाकर बाभुळगांवकर
शब्दप्रपंच-प्रा.मारोती बुद्रुक पाटील
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य किती मोठे असते नुसती स्वप्न पाहून चालत नाही तर ती स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आयुष्याची राख रांगोळी करावी लागते.तेव्हाच आपल्या आयुष्याला बहरलेली बाग पाहायला मिळते.
स्वप्न हे असे साधन आहे जे आपल्याला जीवन जगण्याचे उद्दिष्ट देते.स्वप्न हे एका ध्येयासारखे असते आणि कोणत्याही ध्येयाशिवाय आपण आपल्या आयुष्यात काहीही बनू शकत नाही. महात्मा गांधी महाविद्यालयाच्या जडणघडणीत आणि पॅटर्नमध्ये सरांचा मोलाचा वाटा आहे.ध्येयवादाने झपाटलेले कर्तव्यदक्ष, कर्मनिष्ठ ,विद्यार्थी प्रिय, विलोभनीय सुसंस्कारित सर्व गुणसंपन्न, सर्वांना सोबत घेऊन चालणारे ,चुकलेल्या विद्यार्थ्यांनाही वाट दाखवणारे प्रसंगी कठोर तर कधी माया ममतेने समजून सांगणारे. माणुसकीचा ओतप्रोत झरा असणारे गुरु या पदाला साजेस काम करून आपल्या पाऊलखुणा महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ठेवलेले आदर्श गुरुजी म्हणजे प्रा.प्रभाकर बाभुळगांवकर. विद्यार्थी प्रिय, शिस्तप्रिय,आणि विद्यार्थी चुकला तर त्याची खरडपट्टी काढणारे, त्याला जीवनाचा खरा मार्ग सांगणारे व चुकलेल्या वाटेवरच्या अनेक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना उच्च ध्येय पदापर्यंत पोहोचवणारे खरंच आपण गुरुजीच आहात. होतात आणि पुढे राहतीलच. विद्यार्थी तुमचे ऋण कधीच फेडू शकणार नाहीत माझा मुलगा दीपक मारुती बुद्रुक यालाही आपण अनमोल सल्ला देऊन त्याचे जीवन घडविण्यात आपला खूप पोलाचा वाटा आहे. आमचा परिवार आपले ऋण कधीही फेडू शकणार नाही.
शिक्षणाचा खरा पॅटर्न सुरू झाला तो अहमदपूर मधूनच. अवघ्या महाराष्ट्रात अहमदपूरचे नाव गाजले आणि वाजत राहिले त्या महात्मा गांधी महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्रा. बाभुळगांवकर सर निर्मोही ….संघर्षशील… प्रयत्नशील….कार्यतत्पर…अभ्यासू… आणि आदर्श..सामर्थ्यशली….. कर्तृत्ववान”माणसात देव शोधणारा डोळस कर्मयोगी…
, सर्वगुणसंपन्न, प्रेमळ, मित्रासाठी चंदनाप्रमाणे झिजाणारा , फुला प्रमाणे सुगंध देणारा, वात्सल्य,प्रेम,जिव्हाळा, माया,ममता,करूणेने ओतप्रोत भरलेला सच्चा दिलदार मित्र, ज्यांच्यात पृथ्वीची उदारता, सागराची अथांगता, चंदनाची शीतलता, फुलाची मधुरता कायम बहरत असते. ज्यांना ज्यांना त्यांचा सहवास मिळाला ते कायमचे मित्र झाले. सरांच्या आयुष्यातील हा शब्द प्रपंच आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे.
ऊन,वारा,थंडी,पाऊस,वादळे अंगावर घेत विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी स्वतःच्या जीवावर अनेक संकटे झेलत कुटुंबासोबत, नातेवाईका सोबत उत्सवांमध्ये आनंद साजरा न करता कर्तव्यावर स्वार होऊन आपलं आयुष्य जगणारा खरा हाडामासाचा शिक्षक बाभुळगांवकर सर असामान्य, प्रेरणादायी व्यक्तिमत्व होय. विद्यार्थ्याना, तरुणांना योग्य असे मार्गदर्शन करुन त्यांना जीवनाच्या खरा मार्ग दाखविणारे एक आदर्श शिक्षक. काहीही झाले तरी डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर ठेवून सरांनी आतापर्यंतचे आयुष्य जगले.वेळप्रसंगी रागावले परंतु मनात कधीच राग, व्देश, मत्सर बाळगला नाही. हे सरांचे वेगळेपण आहे. काही कारणास्तव रागावले असले तरी आपलसं करुन खर काय आहे हे अप्रत्यक्षरित्या समजावुन सांगुन त्यांना आपलस करून घेतल सर्वांना जमत नाही..
विचार विकास मंडळ संचलित, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय अहमदपूर जि.लातूर येथील गणित विषयाचे शिक्षक श्री.प्रभाकर बाबाराव बाभुळगांवकर हे 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर उपप्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. सरांचा जन्म नांदेड शहरालगत बाभुळगांव येथे 25 जूलै 1966 रोजी झाला आई-वडिलांनी त्यांचे नाव प्रभाकर ठेवले. प्रभाकर म्हणजे सूर्य सूर्यासारखं तेजस्वी ,इतरांना प्रकाश देऊन अंधाराचे कायम साम्राज्य दूर करण्यासाठी त्यांचा नावाप्रमाणेच प्रयत्न राहिला सरांच्या घरची जेमतेम परिस्थिती ,अल्पभूधारक शेतकरी व कुंभारकाम स्वव्यवसाय करणाऱ्या जेमतेम अर्थिक परिस्थिती असणार्या कुटुंबात झाला.आजी,आई-वडील,चार भाऊ व दोन बहिणी असा त्यांचा बालपणीचा परिवार होता.तर सर हे कुटुंबातील सर्वात लहान होते.सरांचे प्राथमिक शिक्षण बाभुळगांव येथील जि.प.शाळेत झाले.पुढे मोठे भाऊ विठ्ठल बाभुळगांवकर हे छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी कंपनीत नोकरीस लागले.त्यामुळे मोठ्या भावाच्या मदतीने माध्यमिक शिक्षण हे श्री सरस्वती भुवन हायस्कूल छत्रपती संभाजीनगर येथे झाले.पुढील उच्च माध्यमिक, पदवी बी.एस्सी. व पदव्युत्तर एम.एस्सी. (गणित) हे संपूर्ण शिक्षण नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेज नांदेड येथे झाले. विशेष म्हणजे एम.एस्सी. गणित विषयात मराठवाडा विद्यापीठात ( आजचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर) मार्च/ एप्रिल 1991 परीक्षेत चौथा Rank मिळाला.शारदा भवन अध्यापक महाविद्यालय नांदेड येथून एप्रिल 1993 परीक्षेत बी.एड. शिक्षण पूर्ण केले.या परीक्षेचा निकाल 9 जून 1993 ला लागला आणि दुसर्या दिवसापासून नोकरीची शोध मोहीम सुरू झाली.तेथून एक ते दीड महिन्यात नांदेड जिल्ह्यातील चार शाळेत शिक्षक पदासाठी व दोन वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक पदासाठी मुलाखती दिल्या परंतू कुठेही दाळ शिजली नाही.25 जूलै 1988 ते 24 जूलै 1993 हा सरांच्या जीवनातील अत्यंत संघर्षाचा काळ होता.या काळातील शिक्षण हे इयत्ता 11 वी,12 वी आणि तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या गणित विषयाच्या खाजगी शिकवणी घेऊन केले.त्याशिवाय एम.एस्सी.सुरू असतांना सिडको नांदेड येथे कस्तुरबा गांधी कन्या शाळेत गणित विषयाचे शिक्षक म्हणून दोन वर्ष काम केले आणि बी.एड.चे शिक्षण सुरू असतांना एक वर्ष वसंतराव नाईक महाविद्यालय सिडको नांदेड येथे पदवी वर्गास शिकविण्याचे काम केले.या अथक परिश्रमाचे फलित म्हणून 25 जुलै 1993 ला विचार विकास मंडळ संचलित अहमदपूर जि.लातूर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात सरांची गणित शिक्षक म्हणून केवळ गुणवत्तेवर निवड झाली.त्यामुळे सर संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष कै.भगवानरावजी नागरगोजे ,सचिव कै.भाई किशनरावजी देशमुख ,कै.कॅप्टन व्ही.व्ही.ढोबळे यांचे खूप ऋण व्यक्त करतात.गणित शिक्षक म्हणून घडविण्याचे श्रेय प्रामुख्याने एन.ई.एस. सायन्स कॉलेज नांदेड येथील त्यांचे गुरूवर्य प्रा.डॉ. एस.टी.पाटील व प्राचार्य डॉ.एस.बी.आगाशे या दोन महान विभुतींना देतात.या दोन्ही गुरूवर्यांचे अशिर्वाद घेऊन 26 जुलै 1993 ला म.गां.म. अहमदपूरला गणित शिक्षक म्हणून रूजू झाले.एकूण 31 वर्ष सेवेच्या कालावधीत दहा हजार पेक्षा जास्त इंजिनिअर ,दोन हजार पेक्षा जास्त डॉक्टर, वीस पेक्षा जास्त भारतीय प्रशासन सेवा ( IAS,IPS,IRS,IFS,IAAS,IIS ),तसेच
दहा पेक्षा जास्त उपजिल्हाधिकारी ,तहसीलदार आणि अशा असंख्य सेवेत विद्यार्थी घडविण्याच्या प्रक्रियेत एक घटक म्हणून खारीचा वाटा उचलता आल्याने ते समाधान व्यक्त करतात.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12 वी गणित व संख्याशास्त्र भाग -1 च्या क्रमिक पुस्तक प्रथम आवृत्ती 2010 चे लेखक होते.यापूर्वीही बोर्डाच्या गणित विषयाच्या प्रश्नपेढीवर विषय तज्ज्ञ म्हणून काम केले आहे.वर्ष 2014 ते 2021 या कालावधीत विद्याभारती प्रकाशनच्या Complete Objective Mathematics for MHT-CET and JEE Mains Volume l , Volume ll या दोन्ही पुस्तकावर लेखक म्हणून काम केले.
नोकरीत असतांना नोव्हेंबर 2007 मध्ये गणित विषयात एम.फिल. हे शिक्षण पण पुर्ण केले.
सरांच्या अर्धांगिनी सौ.शोभा या एम.ए.डी.एड. असून जि.प.शाळेत शिक्षिका आहेत. सरांच्या खांद्याला खांदा लावून त्या प्रत्येक संकटात आणि सुखदुःखात साथ देत आल्या आहेत. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो तो कायम हात सरांच्या सोबत आहे. विद्यार्थी घडवताना घराकडे सरांनी दुर्लक्ष मात्र केले नाही सरांची जेष्ठ कन्या शुभदा ही बी.टेक.एम.बी.ए.Data Analytics असून मुंबई येथे येस बँकेच्या हेड ऑफिसला सीनिअर मॅनेजर (Data Scientist)आहे.तर लहान कन्या ही हैदराबाद येथे MBBS च्या तृतीय वर्षात शिकत आहे.
शैक्षणिक जबाबदारी यशस्वी सांभाळून तब्बल वीस वर्ष स्टाफ सेक्रेटरी,एक वर्ष पतसंस्था अध्यक्ष, एक वर्ष जुक्टा अध्यक्ष, पाच वर्ष विचार विकास मंडळ शिक्षक प्रतिनिधी सदस्य, एक वर्ष सीईटी सेल प्रमुख, दोन वर्ष विज्ञान शाखेचे पर्यवेक्षक अशा विविध जबाबदार्या यशस्वी पणे सांभाळणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे शिक्षक श्री.प्रभाकर बाबाराव बाभुळगांवकर सर हे नियत वयोमानानुसार दिनांक 31 जूलै 2024 रोजी सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या कार्याची यशोगाथा निश्चितच महात्मा गांधी महाविद्यालयाच्या इतिहासात कायम अजरामर असणार आहे.तुमचा प्रभाव वर्गाच्या पलीकडे पसरला आहे आणि तुम्ही असंख्य विद्यार्थी आणि सहकाऱ्यांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.अशी प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद.
तुमचे उर्वरित आयुष्य कुटुंबासाठी आणि समाजकार्यासाठी जावं. यासाठी आरोग्यदायी सेवापूर्तीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
शब्दप्रपंच
प्रा.मारोती बुद्रुक पाटील.
अहमदपूर मो.9146411111.
9146751111
