क्रांतीसिंह नाना पाटील संसंदेत मराठी भाषण करणारे पहिले खासदार होते – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
क्रांतीसिंह नाना पाटील संसंदेत मराठी भाषण करणारे पहिले खासदार होते - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
अहमदपूर (गोविंद काळे) : क्रांतीसिंह नाना पाटलांनी १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नोकरीचा त्याग करीत ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, त्यांनी जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न सिंहाप्रमाणे केला, एवढेच नव्हे तर भारताच्या संसदेत मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार होते असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या आयक्यूएसी विभागांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक तथा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते तर; विचारमंचावर मोहम्मद वाजिद अली खान व एम.ए. कादरी, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाप्रसंगी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील पुढे म्हणाले की, क्रांतीसिंह नानासिंहा वर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून त्यांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा देण्याचे काम नानासिंहांनी केले. आपल्या भाषणांद्वारे ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेतले. स्वातंत्र्यलढा म्हणजे काय आणि तो का महत्वाचा आहे हे गावागावात पोहचवण्याचे काम क्रांतीसिंहांनी केले. तसेच खासदार झाल्यानंतर संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी अवयवदान दिनाचे औचित्य साधून अवयवदानाची शपथ उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले व आभार डॉ. किरण गुट्टे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
