उदगीरचा पिकविमा प्रश्न चवाट्यावर, सोसायटी चेअरमन आक्रमक

0
उदगीरचा पिकविमा प्रश्न चवाट्यावर, सोसायटी चेअरमन आक्रमक

उदगीरचा पिकविमा प्रश्न चवाट्यावर, सोसायटी चेअरमन आक्रमक

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील चेअरमन यांनी एकत्र येऊन खरीप हंगाम २०२३ च्या पिकविम्याचा प्रश्न प्रशासन आणि उदगीरचे लोकप्रतिनिधी ना.संजय बनसोडे यांच्याकडे निवेदन देऊन मांडला होता. तसेच प्रशासन आणि शासनाकडून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली जावी अशी मागणी केली होती मात्र विमा मागणीचा प्रश्न उपस्थित करुन जवळपास २० दिवस झाले आहेत, तरी आजपर्यंत ना.बनसोडे यांनी शेतकऱ्यांच्या विम्याबाबत असलेले प्रश्न ऐकून घेण्यासाठी बैठक घेतली नाही, त्यामुळे शेतकरी वर्गातून आता नाराजीचे सुर ऐकू येत आहेत. निवेदन दिलेल्या कार्यकारी संस्थांच्या अध्यक्षांनी यावर आपले मत मांडले आहे. अशी माहिती गंगापूर भाकसखेडा संस्थेचे युवा चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी दिली आहे. उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे तालुका कृषी अधिकारी यांच्या अहवालानुसार खरीप हंगाम २०२३ मध्ये ८०% नुकसान झाले होते, आणि २६ जून २०२३ च्या शासन निर्णयातील ११.२ (ई) कलमानुसार जर पिकाचे बाधित क्षेत्र हे अधिसूचित क्षेत्राच्या २५% पेक्षा जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीला तक्रार देण्याची सुद्धा गरज नसते. अशावेळी अधिसूचित क्षेत्रातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसानभरपाई देणे बंधनकारक असते. तर मग उदगीर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना विमा का दिला जात नाही? आम्हालाच याची कारणे कळत नसल्यामुळे आम्ही ना.बनसोडे यांना विमा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यासाठी दोनवेळा निवेदन दिले, पण त्यांनी यासंदर्भात फक्त टाळाटाळ केली आहे असा आरोपीही या चेअरमन संघटनांनी केला आहे.
त्यांना शेतकऱ्यांच्या पिकविम्या संदर्भातल्या अडचणी ऐकून घ्यायला वेळ नाही. ज्याप्रमाणे त्यांनी नारळ फोडलेली तालुक्यातील अनेक काम तशीच नारळातच गुंडाळून टाकली गेली, त्याचप्रमाणे पिकविम्याचा प्रश्न आम्ही त्यांना गुंडाळून ठेऊ देणार नाही. यावर चर्चा होऊन तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना त्यांचा विमा का आला नाही? हे समजलं पाहिजे. अशी भावनाही विवेक जाधव यांनी व्यक्त केली.
यावेळी उदगीरचे चेअरमन बसवराज पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवावर विमा कंपनीने ४३९२ कोटीचा नफा कमावला आणि याउलट जानेवारी २०२४ ते जून २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्यातील १२६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील १९३ आत्महत्या या ऐन पेरणीत म्हणजे जुन महिन्यात झाल्या, हे दुर्दैव आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या जिवावर उठून विमा कंपनीचे खिशे भरण्याच काम करत आहे. आणि या सरकारमध्ये मंत्री असणारे उदगीरचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आता आम्ही आंदोलनाच्या तयारीला लागलो असून लवकरच जनआंदोलन करून औरंगाबाद खंडपीठात कंपनीविरोधात याचिका दाखल करण्यासाठी पावले उचलत आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.तोंडचीरचे चेअरमन शिवाजीराव पाटील यांनी उदगीर तालुक्यातील परिस्थिती ही “शेतकरी कंगाल – गुत्तेदार मालामाल” अशी झाली असून यास लोकप्रतिनिधी हेच जबाबदार असल्याचे सांगितले. आता या आंदोलनाचा काय परिणाम होईल? याकडे पाहणे महत्वाचे राहणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!