किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालय म्हणून राज्य सरकारची मान्यता
किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालय म्हणून राज्य सरकारची मान्यता
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
अहमदपूर (गोविंद काळे) : किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास राज्य शासनाची मान्यता मिळाली असून, लवकरच हे रुग्णालय प्रत्यक्षात सुरू होऊन नागरिकांना देखील याचा लाभ होणार असून ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाला ‘एक विशेष बाब’ म्हणून श्रेणीवर्धन करण्यास मान्यता मिळाली आहे. तसे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अव्वर सचिव कविता पिसे यांच्या पत्रान्वये मान्यता मिळाली असून या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे किनगाव व परिसरातील नागरिकांना अधिक चांगली व सुलभ आरोग्यसेवा मिळेल.
या रुग्णालयात आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आणि विशेष वैद्यकीय तज्ञांची सुविधा उपलब्ध होणार आहे,
ज्यामुळे विविध आजारांचे निदान आणि उपचार अधिक प्रभावीपणे करता येतील. ग्रामीण भागात आरोग्यसेवा सुधारण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध नागरिक, तसेच इतर सर्वसामान्य रुग्णांना स्थानिक स्तरावर अधिक चांगल्या व तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध होतील. याबद्दल राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो. या निर्णयामुळे स्थानिक आरोग्यसेवांमध्ये मोठा फरक पडणार असून, नागरिकांच्या आरोग्याच्या गरजा अधिक सुलभपणे पूर्ण होतील. अहमदपूर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला असून, या निर्णयामुळे माझ्या मतदारसंघातील आरोग्यसेवांमध्ये मोठा बदल घडणार असल्याचे दै.आदर्श भारत च्या प्रतिनिधी शी सांगीतले.
या रुग्णालयाच्या नवीन सुसज्ज इमारतीसाठी देखील पाठपुरावा करणार असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. तसेच यासाठी सहकार्य केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहे.
