अहमदपूर चाकूर मधील ५३ हजार २४४ महिलांचे अर्ज मंजूर!
अहमदपूर चाकूर मधील ५३ हजार २४४ महिलांचे अर्ज मंजूर!
१७ ऑगस्ट रोजी दोन हफ्त्यांची रक्कम खात्यावर जमा होणार.
अहमदपूर (गोविंद काळे) : राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी, त्यांचे आरोग्य, पोषण, आर्थिक उन्नती यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. यासह मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसंदर्भात अहमदपूर विधानसभा क्षेत्रनिहाय समितीची बैठक आमदर बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस आमदार बाबासाहेब पाटील यांनी राज्य सरकारच्या विविध योजनेविषयी चर्चा केली तसेच या योजना जास्तीत जास्त महिला भगिनी यांच्यापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांची अहमदपूर विधानसभा क्षेत्रनिहाय समितीच्या अध्यक्षपदी तसेच सदस्यपदी श्री. हणमंतराव पाटील आणि प्राचार्या सौ. रेखाताई हाके – पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार केला या सत्काराबद्दल आमदार बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अहमदपूर मधील २९ हजार १२० आणि चाकूर मधील २४ हजार १२४ असे एकूण ५३ हजार २४४ अर्ज या बैठकीत मंजूर करण्यात आले असून या योजनेचे दोन हफ्ते प्रत्येकी ३००० रु. प्रमाणे देण्यात येणार आहे. यासाठी अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील अर्ज मंजूर झालेल्या महिला भगिनिंसाठी एकूण १५ कोटी ९७ लक्ष ३२ रु. १७ ऑगस्ट दरम्यान जमा होणार असल्याची माहिती या बैठकीत दरम्यान आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिली.
प्रसंगी उपजिल्हाधिकारी मंजुषाताई लटपटे मॅडम, अहमदपूर तहसीलदार उज्वलाताई पांगारकर मॅडम, चाकूर तहसीलदार नरसिंगजी जाधव, अहमदपूर गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड, चाकूर गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे, अहमदपूर बालविकास अधिकारी घोडके मॅडम, चाकूर बालविकास अधिकारी लोमटे मॅडम, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सदस्य हणमंतराव पाटील, नायब तहसीलदार मधुकरराव क्षीरसागर, नायब तहसीलदार विलासराव जगताप उपस्थित होते.
कोट : राज्य सरकारने महिला भगिनींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. तसेच माझी लाडकी बहिण योजना देखील राबवली असून याचा जास्तीत जास्त महिला भगिनींनी लाभ घ्यावा. माझी लाडकी बहिण योजनेचा हफ्ता १७ ऑगस्ट दरम्यान खात्यावर जमा होणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत ही आनंदाची बाब आहे.
