चांगलं काय, वाईट काय याचा युवतींनी विचार करुन विवेकी व्हावे – कृष्णात स्वाती
चांगलं काय, वाईट काय याचा युवतींनी विचार करुन विवेकी व्हावे - कृष्णात स्वाती
शाहूवाडी (प्रतिनिधी) : युवा वर्गाने सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्हय वागणूकीचे धडे गिरवावेत. चांगलं काय, वाईट काय याचा विचार करावा, आणि विवेकी बनावे. असे मौलिक मार्गदर्शन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी केले. मलकापूर येथील श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालयात कार्यरत राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग यांच्यावतीने ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रबोधनपर कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एस. पाटील होते. महाविद्यालयाचे समन्वयक भालचंद्र शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे क्रियाशील सदस्य शिवाप्पा पाटील, केंद्र प्रमुख संजय मदने यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. रमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले.
पुढे बोलताना कृष्णात स्वाती म्हणाले की, सर्व युवतींना व शिक्षकांना अभिमान वाटला पाहिजे की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांच्या विचारांचे वारसदार आहोत. प्रबोधनाची, समाजसुधारकांची महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा लाभली असून, वारकरी संप्रदायातील संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गाडगेबाबा यांच्यासह महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, आगरकर, लोकहितवादी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. नरेंद्र दाभोळकर या समाजसुधारकांनी सामाजिक सुधारणा घडवून आणण्यावर भर दिला. अंधश्रद्धांच्या निर्मूलनाचा समाजसुधारकांनी दिलेला वसा आणि वारसा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुढे चालवत आहे. सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने संघटनेचे कार्य महत्त्वाचे आहे, आणि ते अधिक व्यापक करणे गरजेचे आहे. सद्यःस्थितीत सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्रांती होणे देखील गरजेचे आहे. आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचे निर्मूलन झाल्याशिवाय ही क्रांती होणार नाही, हे परिवर्तन होणार नाही. त्यामुळे युवा वर्गाने कार्यकारण भावाचा उत्कटपणे विवेकशील विचार करावा, असेही कृष्णात स्वाती म्हणाले. अंधश्रद्धेच्या नावाखाली नरबळी दिले जातात, लैंगिक शोषण केले जाते. तरुणींनी सैराट न होता आकर्षण आणि प्रेमसुलभ भावना यामधील फरक ओळखून अनुरुप जोडीदाराची निवड करावी, सहजीवनाची योग्य सुरुवात करावी आणि समाजाच्या उन्नतीसाठी मूल्यांची जोपासना करावी, असाही सल्ला त्यांनी दिला.
शिवाप्पा पाटील यांनी नागपंचमी सणाचे औचित्य साधून भारतीय समाजमनात सापांविषयी असलेल्या गैरसमजुतींवर, त्यांच्याशी निगडीत असलेल्या अंधश्रद्धांवर प्रकाश टाकला. साप नव्हे तर निसर्गातील प्रत्येक प्राणी हा माणसाचा मित्र आहे. मात्र माणूसच आज प्रत्येक प्राण्याचा शत्रू बनत आहे. त्यामुळे माणसाने विनाश ओढावून घेतला आहे. माणसाने जीवसृष्टीतील प्रत्येक घटकाविषयी संवेदनशील असावे, त्यांच्याशी संवाद साधायला हवा, असेही शिवाप्पा पाटील म्हणाले. यावेळी महाविद्यालयीन युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रा. प्रशांत कांबळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन करुन सूत्रसंचालन केले. प्रा. आर. एम. म्हावळे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. जयश्री शिंगटे, प्रा. साक्षी कुलकर्णी, प्रा. विश्व गांधी आदींनी परिश्रम घेतले.
