श्रम आणि समतेला प्रतिष्ठा देणारा लोकप्रिय राजा शाहू महाराज.- ईशान संगमनेरकर
श्रम आणि समतेला प्रतिष्ठा देणारा लोकप्रिय राजा शाहू महाराज.- ईशान संगमनेरकर
उदगीर (एल.पी.उगीले) : श्रमाशिवाय सुख नाही, समतेशिवाय समाधान नाही.असे म्हटले जात असले तरी आज श्रमावर विश्वास ठेवणाऱ्यांची आणि समता पाळणाऱ्यांची संख्या मात्र खूपच कमी आहे. रयतेतल्या सर्वसामान्यांच्या प्रगती आणि उन्नतीला डोळ्यासमोर ठेवून सर्वधर्मसमभाव जोपासत श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देताना माणुसकीला समोर ठेवून अपप्रवृत्तीला सातत्याने विरोध करणारा व सर्वात शेवटच्या माणसाच्या उन्नतीसाठी लढा उभा करून श्रम आणि समतेला प्रतिष्ठा मिळवून देणारा लोक राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज होत. असे मत ईशान संगमनेरकर यांनी व्यक्त केले.
उदगीरचे उपजिल्हाधिकारी डॉ.सुशांत शिंदे यांचे अध्यक्षतेखाली “चला कवितेच्या बनात” या शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक चळवळ अंतर्गत संपन्न झालेल्या वाचक संवाद चे 318 वे पुष्प कांदिवली पुर्व, मुंबई.येथील प्रसिद्ध साहित्यिक ईशान संगमनेरकर यांनी धनंजय कीर लिखित “लोकराजा शाहू महाराज:व्यक्तीत्व आणि विचार” या साहित्यकृतीवर बोलताना म्हणाले की, प्रत्येकास आपल्या धर्मभोळेपणाची चीड येऊन आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचे मूळ उखडून टाकण्यासाठी असंतोष बाळगता आला पाहिजे. पण तो राजकीय किंवा धार्मिक असू नये. यासाठी शाहू राजाने शिक्षणाला प्राधान्य देत, सामाजिक लढा उभा करत, नाविन्याचा शोध घेऊन उद्योग, उद्दीम चालू केले. नम्रता, शालिनीता जोपासत अहंकाराला त्यागण्याचा सल्ला देखील दिला. अस्पृश्यता निवारणासाठी वस्तीगृहाची चळवळ देखील शाहू राजांनी चालू केली.
यावेळी उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देण्यात आली. यानंतर झालेल्या चर्चेत अनेकांनी सहभाग नोंदवला.शेवटी अध्यक्षीय समारोपात डॉ. सुशांत शिंदे म्हणाले की,
रयतेतला सर्व समाज घटकांना एकत्र करण्यासाठी शाहू राजांनी सामाजिक क्रांती घडवून आणली. अनेक उद्योगधंदे चालू केले, खेळांना प्रोत्साहन दिले. आपल्या परिसरात धरणांचे बांधकाम केले. एवढंच नाही तर गोरगरिबांसाठी वस्तीगृहांची निर्मिती केली. अशा या श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वावर आज आपण चिंतन केलात याचा उपयोग आपल्या समाजाच्या प्रगती आणि उन्नतीसाठी व्हावा.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाटककार तुळशीदास बिरादार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.राजपाल पाटील यांनी करून दिला तर आभार मुरलीधर जाधव यांनी मानले. कार्यक्रमास राजेंद्र सगर, देवेंद्र गावंडे,पुणे, राहूल भड,बार्शी, रणजीत पवार, जुन्नर, प्रभू जाचक चिंचवड यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यशसावीततेसाठी संयोजक अनंत कदम, आनंद बिरादार, हणमंत म्हेत्रे आदिंनी परिश्रम घेतले.
