महायुतीचे सरकार शेतकरी विरोधी – विवेक पंडितराव जाधव
महायुतीचे सरकार शेतकरी विरोधी - विवेक पंडितराव जाधव
उदगीर (एल.पी.उगीले) राज्यात आणि केंद्रामध्ये महायुतीचे सरकार आहे हे सरकार शेतकरी विरोधी आहे. या सरकारने नुकताच एक फसव्या योजनेचा आदेश काढला आहे. सोयाबीन व कापूस पिकासाठी एकरी २००० रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय सरकारद्वारे निर्गमित करण्यात आला आहे.सदर निर्णयात एक जाचक अट सुद्धा ठेवण्यात आली आहे की, ज्या शेतकऱ्यांनी ई – पीक पाहणी केली आहे, त्यांनाच या अर्थसहाय्याचा लाभ मिळणार आहे. याचा अर्थ असा की, जमिनीची मशागत आम्ही करायची, पेरणी आम्ही करायची, नुकसान आम्ही सहन करायचं आणि ई – पीक पाहणी सुद्धा आम्हीच करायची. तर मग शासकीय अधिकाऱ्यांना नेमक्या पगारी कशाच्या देताय ? असा सवाल गंगापूर भाकसखेडा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी केला आहे.
शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला स्मार्टफोन आणि अंबानीच्या कंपनीची इंटरनेट सेवा मोफत दिली असती तर एखादवेळी अशा “ई” अटी लादणे समजू शकते, परंतु ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, ज्यांना ई-पीक पाहणी करता येत नाही. त्या शेकऱ्यांनी नेमकं काय करायचं ?
अगोदरच विमा कंपनीचे खिसे भरून शेतकऱ्यांच्या नावाखाली सरकारी तिजोरीतील पैसा लुटण्याचं काम यांनी केलंय, वर्ष सरून गेलं, तरी पिकविमा दिला नाही. आणि आता ही शेतकऱ्यांना एकरी २००० रुवायांची भीक देणारी बोगस योजना जाहीर करताना “ई-पीक पाहणी” ची अट टाकणे म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लाभ न देता, केवळ जाहिरातबाजी आणि निवडणुकीत मतासाठी चालू केलेली उठाठेव दिसून येत आहे, सरकारला शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना कळत नसतील तर निदान शेजारच्या तेलंगणा सरकारकडे पाहून सरसकट कर्जमाफी तरी करुन दाखवा. अशी सडेतोड भूमिका वेळोवेळी शेतकऱ्यांचे प्रश्न स्पष्टपणे मांडण्याची भूमिका घेणारे उदगीर तालुक्यातील गंगापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे युवा चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी मांडली आहे.
