उदगीर विधानसभेवर काँग्रेस पक्षाचा हक्क – कल्याण पाटील
उदगीर विधानसभेवर काँग्रेस पक्षाचा हक्क - कल्याण पाटील
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचाच हक्क आहे, कारण उदगीर विधानसभा मतदारसंघातील कार्यक्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद जास्त आहे. या परिसरात काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी जीवाचे रान करून पक्ष संघटन बांधनी केलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका असतील, प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून पक्षश्रेष्ठींचा आदेश पाळलेला आहे. आघाडीचा धर्म पाळलेला आहे, असे असताना जर चालून संधी आलेली असेल तर त्या परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही. याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींवर आहे, त्यामुळे उदगीर विधानसभेची जागा महाविकास आघाडीच्या कोट्यातून काँग्रेस पक्षाने सोडउन घ्यावी. अशी आग्रही मागणी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील यांनी पक्षश्रेष्ठी समोर केली.
मराठवाड्यातील काँग्रेसचे खासदार आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने नियुक्त केलेले प्रदेश प्रभारी रमेश चन्नीथला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. अमित देशमुख, सहकार महर्षी माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख, आ. धीरज देशमुख आणि लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण, खा. डॉ. काळे यांच्या उपस्थितीमध्ये मराठवाड्यातील विधानसभेच्या जागाच्या अनुषंगाने काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये कल्याण पाटील बोलत होते.
उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची म्हणावी तशी ताकद नाही, शिवाय काँग्रेसच्या तुलनेत त्यांच्याकडे कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था नाही. कार्यकर्त्यांची ताकदही अत्यंत कमी आहे. या पार्श्वभूमीवर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या ऐवजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सोडावी. जेणेकरून ही जागा महाविकास आघाडीला जिंकता येणे सहज शक्य होईल. असा विश्वासही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींच्या समोर तालुकाध्यक्ष कल्याण पाटील यांनी व्यक्त केला आहे.
