बेरोजगारांच्या हाताला काम!! शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या घामाला दाम !! हेच ध्येय – स्वप्निल जाधव

0
बेरोजगारांच्या हाताला काम!! शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या घामाला दाम !! हेच ध्येय - स्वप्निल जाधव

बेरोजगारांच्या हाताला काम!! शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या घामाला दाम !! हेच ध्येय - स्वप्निल जाधव

उदगीर (एल.पी. उगिले) : उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने योग्य उमेदवार निवडायचा प्रयत्न करत आहेत. महायुतीच्या वतीने विद्यमान आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.संजय बनसोडे यांची उमेदवारी निश्चित आहे. महाविकास आघाडी कडून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही.
या गोंधळलेल्या परिस्थितीत एक निधड्या छातीचा तरुण स्वप्नील जाधव हा मोठ मोठी ध्येय घेऊन, बेरोजगारांच्या हाताला काम आणि शेतकरी व कष्टकरी यांच्या घामाला दाम मिळवून देण्यासाठी आपण राजकारणाच्या आखाड्यात उतरत असल्याचे या तरुणाने जाहीर केले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले जाण्यापेक्षा, स्वतंत्रपणे जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने विजयश्री खेचून आणण्याची धमक या तरुणात दिसून येत आहे. त्यामुळेच मतदार संघातील बहुतांश युवक सध्यातरी स्वप्निल जाधव यांच्यासोबत दिसत आहेत.
अगदी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा अनुभव स्वप्निल जाधव यांच्याकडे आहे. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी अगदी मोकळेपणाने स्पष्ट सांगितले की, माझ्या वडिलांनी उपजीविकेसाठी गाव सोडले. पुणे येथे रोजंदारी करत चार पैसे कमावले आणि स्वतःचा उद्योग उभा केला. पुढे त्या उद्योगाचा विकास करत, इतर अनेक लोकांना प्रेरणा ठरावी अशा पद्धतीची विकासाची एक पायरी आपण गाठली, अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणारा उद्योग उभा केला. आजही आपल्या भागातून मोठ्या प्रमाणात गोरगरिबाना हाताला काम नाही, म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी मोठमोठ्या शहराकडे स्थलांतर करावे लागत आहे. गेल्या दहा वर्षात तरुणांना नोकऱ्या देण्याची मोठमोठे आश्वासन देण्यात आली, मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे इतरत्र पळवले गेले. महाराष्ट्रातील लाखो तरुण आज बेकारीच्या झळा सोसत आहेत. आपल्याही विधानसभा मतदारसंघात अनेक असे तरुण बेकार आहेत. बेरोजगारीमुळे ते उदासीन बनत आहेत, तरुणांची उमेद या उदासीनतेमुळे नष्ट होत आहे. परिणामतः तरुण व्यसनाधीन होत आहेत. चार पैसे कमावण्याची कुवत त्यांच्यात आहे. मात्र त्यांना संधी मिळत नाही. त्यांचे हे दुःख कोणी ओळखत नाही. हे दुर्दैव म्हणावे लागेल. आणि त्यांचे दुःख नष्ट करण्यासाठी आणि अश्रू पुसण्यासाठी आपण पुढाकार घेत आहोत. जनतेने आशीर्वाद दिल्यास, मतदारसंघातील एकही तरुण, बेरोजगार हाताला काम मिळावे म्हणून मतदारसंघाच्या बाहेर जाणार नाही. अशी व्यवस्था आपण करू शकतो, असा ठाम विश्वास हा तरुण बोलून दाखवत आहे. मतदार संघाचा अभ्यास करून तसेच मतदार संघातील कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार यांचे कष्ट कमी करण्यासाठीच आपली उमेदवारी असेल असेही वेळोवेळी स्वप्निल जाधव सांगत आहेत.
राजकारण म्हटल्यानंतर रथी महारथी मैदानात उतरणार हे तर ठरलेलेच असते. त्या महारथींच्या तुलनेत आपण आर्थिक तोडीस तोड ठरू की नाही हे माहित नाही. मात्र आपल्याकडे एक विकासात्मक विचारधारा आहे. काहीतरी नवीन करून दाखवण्याची कुवत आहे. आपण ते करून दाखवले आहे, युवकांच्या डोळ्यापुढे तो आदर्श उभा करून तरुणांना स्वतःच्या पायावर उभा करण्याची जी गरज समाजाची आहे ती गरज आपण भागऊ शकतो. युवकांना दिशा देऊ शकतो. जनतेने साथ द्यावी, अशी साद ही स्वप्नील जाधव यांनी जनतेला दिली आहे.
राजकारण म्हटले की साम, दाम, दंड, भेद या सर्व नीतीचा अवलंब केला जातो. त्यामुळे येणाऱ्या काळात काय काय बदल होतील? हे सांगता येत नाही, एक मात्र नक्की, या सकारात्मक विचारधारा घेऊन राजकारणाच्या चक्रव्यूहात हा अभिमन्यू उतरला आहे. आणि तो यशस्वी होईल असे त्याच्या आत्मविश्वासा वरून वाटू लागले आहे.
महाविकास आघाडीकडून उदगीर विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला सुटली पाहिजे. असा आग्रह धरतानाच काँग्रेसच्या वतीने माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सौ. उषा कांबळे यांनाच उमेदवारी द्यावी. अशी ही मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. काँग्रेसचे मनुष्यबळ विचारात घेऊन, पक्षश्रेष्ठी निश्चितपणे गांभीर्याने विचार करेल. असा आशावाद माजी पालकमंत्री आ. अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला दिसून येत आहे.
महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडूनही माजी आ. सुधाकर भालेराव यांनी आपली पूर्ण ताकद लावली आहे. संधी कोणाला मिळेल? हे आज सांगता येत नाही. मात्र उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांनी केलेल्या विकास कामाची पावती म्हणून मतदार निश्चितपणे आपल्यालाच कौल देतील. असा विश्वास ना संजय बनसोडे यांना आहे. विकासाचा डोंगर उभा केला आहे. गेल्या पन्नास वर्षात जी कामे प्रलंबित होती, ती आपण पूर्ण केली आहेत, इतकेच नाही तर भविष्यात देखील कोणती अडचण येऊ नये, या दृष्टीने अनेक बाबींचा विचार करून भरपूर नियोजन केलेले आहे. कोट्यावधींचा निधी त्यासाठी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे उदगीरची जनता आपल्यालाच विजयी करेल. असा ठाम विश्वास महायुतीला वाटतो आहे.
विधानसभेच्या निवडणुकांमध्ये नशीब अजमावण्यासाठी राष्ट्रीय दलित अधिकार मंच चे प्रदेशाध्यक्ष तथा अखिल भारतीय दलित पॅंथरचे नेते, दलित मुस्लिम ऐक्य परिषदेचे मार्गदर्शक, उदगीर नगरपालिकेचे माजी विकास व नियोजन सभापती निवृत्ती सांगवे हे देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरतील, अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्याकडून सुरू असून त्या दष्टीने कार्यकर्ते बैठका लावत असल्याचे
बोलले जात आहे. एकंदरीत उदगीर विधानसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होण्याची चिन्ह दिसून येत आहेत.
या धावपळीतच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनीही विधानसभेची निवडणूक लढवावी. अशी अपेक्षा त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याकडून व्यक्त केली जात आहे. तसे पाहिल्यास भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध करून देखील लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान सुधाकरराव शृंगारे यांना उदगीर विधानसभा मतदारसंघातून 4700 मताधिक्य मिळालेले आहे. जवळच्या लोकांनी केलेल्या विश्वासघातामुळे त्यांचा पराभव झाल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत. अत्यंत चुकीचे नियोजन आणि फाजील आत्मविश्वास हा त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचेही राजकीय जाणकार बोलत आहेत. या पार्श्वभूमीवर जर माजी खासदार सुधाकरराव शृंगारे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेच तर निवडणुकीची रंगत आणखीच वाढणार आहे. हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज भासणार नाही.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!