ना कोणी रोखतेय! ना कुणी टोकतेय! वाळू माफीयांच्या विनानंबरच्या हायवा सुसाट !!

0
ना कोणी रोखतेय! ना कुणी टोकतेय! वाळू माफीयांच्या विनानंबरच्या हायवा सुसाट !!

ना कोणी रोखतेय! ना कुणी टोकतेय! वाळू माफीयांच्या विनानंबरच्या हायवा सुसाट !!

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर शहर आणि ग्रामीण भागात वाळू माफीयांचा दरारा चांगलाच वाढलेला दिसून येत आहे. जिल्ह्यात इतर अनेक ठिकाणी अशा वाळू माफिया वर कारवाई झाली आहे. मात्र उदगीर शहर आणि ग्रामीण भाग याला अपवाद आहे. याला कोणाचा आशीर्वाद? हे कळायला मार्ग नाही. त्यामुळेच शहरात आणि ग्रामीण भागात विनाक्रमांकाच्या हायवा काठोकाठ भरून सुसाट वेगाने धावताना लोक पाहत आहेत. उदगीर शहर, उदगीर ग्रामीण आणि वाढवणा असे तीन पोलीस स्टेशन असताना देखील या विनाक्रमांकाच्या वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा गाड्यावर कोणतीही कारवाई नाही, किंवा ना कोणाचा रोक, ना कोणाचा टोक! अशी स्थिती असल्याचे सर्रास बोलले जात आहे.
काही महिन्यापूर्वी नांदेड जिल्ह्यातून किमान 30 ते 35 हायवा टिप्पर मध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाळूची वाहतूक सर्रासपणे केली जात होते. रात्रीच्या वेळेस हे धंदे चालत असल्यामुळे आणि याला पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद असावा, अशी शक्यता असल्याकारणाने बिन बोभाट हे वाळूचे हायवा शासनाचा महसूल बुडवून अवैध रीतीने वाळूच्या वाहतुकीसाठी रस्त्यावर ये जा करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यापैकी अनेक हायवा या विना क्रमांकाच्या असल्याने लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. एखादी साधी दुचाकी ये जा करत असेल तर दहा ठिकाणी वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस अडवतात, मात्र अवैध धंद्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्याही वाहनावर कारवाई होत नाही, किंवा साधी चौकशीही केली जात नाही. यामुळे अवैध रेतीची वाहतूक उदगीर परिसरात वाढलेली आहे. महसूल विभाग असेल किंवा आरटीओ असेल किंवा पोलीस विभाग असेल सर्वच मूग गिळून गप्प कसे? असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. या तिन्ही विभागाने एकत्रितपणे येऊन कारवाई केली तर किमान शासनाचा महसूल तरी वसूल होऊ शकेल. मोठ्या प्रमाणात महसूल बुडवून ही अवैध वाहतूक होत असल्याची चर्चा सर्व प्रशासनाला माहीत असताना देखील कारवाई मात्र शून्यच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे या हायवा गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाळू उपसा करून भरला जातो. साधारणतः 18 टन इतकी या हायवा टिप्पर ची क्षमता असते, मात्र प्रत्यक्षात तीस टन वाळू भरून वाहतूक केली जाते, आणि ते देखील बिनदिक्कतपणे! याबद्दल जनतेमध्ये चर्चा होत आहे. या हायवा गाड्यांना क्रमांक नसल्यामुळे या नेमक्या कुठल्या? हेही कळायला मार्ग नाही. नांदेड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी उदगीर परिसरात होत असते. वाळू माफीयांनी मोठमोठे अड्डे बनवले आहेत. कधी कधी तर हा वाळूचा साठा सरळ सरळ रस्त्याच्या बाजूला केला जातो. त्यामुळे वाळू रस्त्यावरही येऊ शकते आणि दुचाकी स्वारांना त्याचा त्रास होऊ शकतो. वाळू रस्त्यावर आल्यानंतर लहान-मोठे अपघात होतात. त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित केला जातो आहे. उदगीर शहरातील जळकोट रोड, देगलूर रोड या भागात सकाळ व संध्याकाळी रस्त्याच्या कडेलाच मोठमोठे टिप्पर वाळू विक्रीसाठी थांबलेले असतात. यामध्ये काही टिप्पर देगलूर, मुखेड, गंगाखेड या भागातून आल्याचे सांगितले जाते. तसेच काही प्रमाणात गोदावरी मधून ही काळी रेती विक्रीसाठी आणली जाते. आता उदगीर शहरात आरटीओ चे कार्यालय आले आहे. त्यामुळे आता तरी किमान अशा अवैध वाळू तस्करीला आळा बसेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जाते आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!