अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा – डॉ. मार्तंड कुलकर्णी

0
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा - डॉ. मार्तंड कुलकर्णी

अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा - डॉ. मार्तंड कुलकर्णी

उदगीर (एल.पी.उगीले) : तीनशे वर्षांपूर्वी आपल्या देशात जन्माला येऊन येथील धर्माचे, राष्ट्राचे रक्षण करीत अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्याचा आदर्श समाजासमोर ठेवला. त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या पिढीने घेऊन काम करावे. असे आवाहन किनवट येथील प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी केले आहे.
उदगीर येथील संस्कार भारती शाखेच्या वतीने मातृभूमी महाविद्यालयात डॉ. मार्तंड कुलकर्णी यांचे अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि कर्तृत्व या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्कार भारतीच्या देवगिरी प्रांताच्या अध्यक्षा स्नेहल पाठक यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर संस्कार भारती उदगीर समितीचे अध्यक्ष सतीश उस्तूरे उपस्थित होते.
प्रारंभी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तद्नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश उस्तूरे यांनी केले.
पुढे बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाले की, वयाच्या आठव्या वर्षी होळकर घराण्याची सून झालेल्या अहिल्यादेवी होळकर यांना आपल्या जीवनात संघर्ष करावा लागला. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला न घाबरता त्यांनी धैर्याने तोंड दिले. त्यांच्या संघर्षात त्यांचे सासरे होळकर यांनी त्यांना मोठी साथ दिली. आपले राज्य सांभाळताना अहिल्यादेवी होळकर यांनी धर्माचे रक्षण केले. शिवाची उपासना करणाऱ्या या रणरागिणीने आपल्या राज्यात अनेक मंदिरे उभी केली. आदर्श पारदर्शक अशा पद्धतीने राज्यकारभार केल्यामुळेच आज तीनशे वर्षांनंतरही त्यांच्या कार्याचा जागर होताना दिसत आहे. आपले पूर्ण आयुष्य त्यांनी राष्ट्रासाठी समर्पित केले असल्याचे यावेळी डॉ. कुलकर्णी म्हणाले. यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करणारे पोवाडे सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी बोलताना स्नेहल पाठक यांनी धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी असते, असे सांगून विद्यार्थ्यांनी आपण कितीही मोठे झालो तरी जमिनीवरच राहून काम करावे, असे आवाहन केले. नेतृत्व करणाऱ्याने कधीही अहंकार व गर्व करू नये, समाजभान राखत राष्ट्राचा विकास समोर ठेवून काम केले पाहिजे. असे सांगत, स्नेहल पाठक यांनी नवी पिढी मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे संवाद कमी झाला असल्याची खंत व्यक्त केली. हा संवाद वाढण्यासाठी पुढच्या पिढीने काम करावे असे आवाहनही यावेळी पाठक यांनी केले.
या कार्यक्रमात उदगीरची लेक असलेल्या स्नेहल पाठक यांची संस्कार भारतीच्या देवगिरी प्रांताच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्कार भारती उदगीर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय धनंजय गुडसुरकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राचार्य श्रीपाद सिमंतकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कार भारतीचे डॉ. संजय कुलकर्णी, सावन टांकसाळे, डॉ. मुकेश कुलकर्णी, प्राचार्य उषा कुलकर्णी,प्रदीप पत्तेवार, डॉ. श्रीकांत मध्वरे, गोपाळ जोशी गुरुजी, बालाजी मुर्के, प्रा. प्रसाद जालनापूरकर, महादेव खताळ, विक्रम हलकीकर, संतोष जोशी, डॉ. ज्योती मध्वरे, संध्या पत्तेवार, बिभीषण मद्देवाड आदींनी पुढाकार घेतला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!