सामाजिक उपक्रम दातृत्वाची भावना शिकवितात – प्रा. डॉ. गौरव जेवळीकर

0
सामाजिक उपक्रम दातृत्वाची भावना शिकवितात - प्रा. डॉ. गौरव जेवळीकर

उदगीर : (एल.पी.उगीले ) कविवर्य विं. दा. करंदीकर आपल्या कवितेत म्हणतात, ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता-घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे’ हा दातृत्वभाव सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिकायला मिळत असतो, असे मत, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी व्यक्त केले. ते जीवन प्रयाग फाऊंडेशन,उदगीर आयोजित बाळासाहेब बिराजदार यांच्या जन्मदिनानिमित्त ॲड.शिवम चणगे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक युनूस पठाण हे होते. यावेळी मंचावर बामणी गावचे सरपंच राजकुमार बिराजदार, ग्रामसेवक संजीव गुरमे, केंद्रप्रमुख राम शेटे, बाळासाहेब बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा.डॉ.गौरव जेवळीकर म्हणाले, इतरांनी आपल्याला सहकार्य करावे, असे आपल्याला वाटत असेल तर आपण इतरांना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. लहान वयातच सामाजिक उपक्रमात सहभाग घेण्याची आवड निर्माण झाली तर त्याचा निश्चितच चांगला सामाजिक परिणाम दिसून येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे बामणी गावचे सुपुत्र बाळासाहेब बिराजदार हे आहेत, असे मत मांडले. त्यांच्या कार्यातून आपणही प्रेरणा घ्यावी, असे आवाहन उपस्थितांना केले. बामणी गावचे सरपंच राजकुमार बिराजदार यांनी गावातील विकासकामांचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला. तसेच उद्याचे गावाचे खरे आधारस्तंभ तुम्ही आहात. त्यामुळे सर्वसामाजिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. बाळासाहेब बिराजदार यांनी जीवन प्रयाग फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमित लाल यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीश शिरसे यांनी तर आभार सहशिक्षक विजयकुमार गबाळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीवन प्रयाग फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभात सूर्यवंशी तसेच क्षितिज जाधव यांनी पुढाकार घेतला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!