साहित्यातून जीवन सौंदर्याची अनुभूती येते – प्राचार्य डॉ. बी.टी. लहाने
साहित्यातून जीवन सौंदर्याची अनुभूती येते - प्राचार्य डॉ. बी.टी. लहाने
अहमदपूर (गोविंद काळे) : साहित्य माणसाला जीवन जगायला शिकवतं. वेगळ्या पद्धतीने विचार करायला शिकवतं. साहित्य हे मानवी जीवनासाठी वरदान असून, साहित्यातून जीवन सौंदर्यांची अनुभूती येते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत तथा संभाजीराव केंद्रे महाविद्यालय, जळकोटचे प्राचार्य डॉ. बी.टी.लहाने यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात ( आय.क्यू.ए.सी. ) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षांतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषा वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. लहाने बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर विचारपीठावर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. लहाने म्हणाले की, माणूस हा अनुकरणप्रिय असून भाषेच्या माध्यमातून जीवनातील मांगल्याचे अनुकरण करत माणसानं साहित्य निर्माण केलं. मानवी जीवन जेव्हा संकटात सापडते, तेव्हा साहित्यच मदतीला धावून येते असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, सध्याच्या मोबाईल युगात माणूस वाचनापासून दुरावत चालला असून, त्यामुळे मानवी मूल्यांचा ऱ्हास होत चालला आहे. समृद्ध जीवन जगण्यासाठी वाचलेच पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकांचे प्रकाशनही करण्यात आले. तसेच कु. शिवकन्या सुरनर , कु. आरती मंडले या विद्यार्थिनींनी स्वागत गीताच्या माध्यमातून मान्यवरांचे स्वागत केले. तसेच मराठी विभागाच्या वतीने कु. वैष्णवी स्वामी , हिंदी विभागाच्या वतीने भागवत भोसले , इंग्रजी विभागाच्या वतीने कु. शिवकन्या सुरनर तर संस्कृत विभागाच्या वतीने वेदांत जोशी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत बिरादार यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. किरण गुट्टे यांनी करून दिला. सूत्रसंचालन ह. भ. प. प्रो. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले, तर प्रो.डॉ. एन.यू. मुळे यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
