भाजपाचे हित आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी राजकारणात – इंजि. विश्वजीत गायकवाड

0
भाजपाचे हित आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी राजकारणात - इंजि. विश्वजीत गायकवाड

भाजपाचे हित आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी राजकारणात - इंजि. विश्वजीत गायकवाड

उदगीर (प्रतिनिधी) : देशामध्ये सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष हा आता लोकांच्या मनामध्ये घर करू लागला आहे. ते विचार आणखी मजबूत करण्यासाठी आणि पक्ष संघटन वाढीच्या बरोबरीनेच पक्ष संघटन वाढावे म्हणून सतत प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही बळ देण्यासाठी मी आणि माझी फाउंडेशन सर्व ताकतीनिशी राजकारणात उतरत असल्याचे मनोगत इंजि. विश्वजीत गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
आज पर्यंत आपण ठराविक कोणता प्रभाग किंवा मतदार संघाचा विचार न करता इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने रोजगार अभीमुख कार्यक्रम राबवत आहोत. जिल्हा परिषद शाळा मधून शिक्षण घेणाऱ्या मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांच्या समाधानासाठी आणि त्यांची गरज म्हणून अत्यंत दर्जेदार अशा पद्धतीचे शैक्षणिक साहित्य आणि स्कूल बॅग वाटप करत आहोत. महाराष्ट्रात जवळपास 30000 हून अधिक स्कूल बॅग आणि शैक्षणिक साहित्य, वह्या पुस्तके आपण वाटप केले आहेत.
एक सामाजिक जाण जपत असतानाच समाजकार्याला गतिमान करण्यासाठी राजकारणाची जोड दिली तर त्या समाजकार्याला राज मान्यता प्राप्त होते, हे लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण सक्रिय झालो आहोत. आणि आता प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या भेटीमुळे आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळे आपण गोरगरिबांच्या सेवेचा आणि ग्रामीण भागातील बेरोजगार महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उदगीर विधानसभा मतदारसंघातील 300 महिलांना शिवणकला प्रशिक्षण देऊन त्यांना शिलाई मशीनचे ही वाटप केले आहे. या माध्यमातून त्यांनी शिवलेल्या बॅग इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशन च्या वतीने विकत घेऊन त्यांना आर्थिक बळ दिले आहे. समाजामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे, ती गोष्ट म्हणजे महिलांना आर्थिक सबळ बनवणे. आणि हे कार्य आपले फाउंडेशन पूर्ण ताकतीने करत आहे. याबद्दल आपल्याला समाधान वाटते, गोरगरिबांच्या चेहऱ्यावर निर्माण झालेला आनंद हा आत्मिक समाधान देऊन जातो. हे प्रत्यक्ष आपण अनुभवल्याचेही विश्वजीत गायकवाड सांगतात.
भारतीय जनता पक्षाच्या आदर्श भूमिकेचा विचार करत असताना आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या निवडणुका प्रत्येक पक्ष स्वबळावर लढणार आहे, आणि आज विधानसभेच्या निवडणुका जर भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षाला मोठे करण्याचा निर्णय घेतला तर, दुर्दैवाने तेच पक्ष उद्या प्रतिस्पर्धी राहणार आहेत. त्यामुळे स्थानिकचा कार्यकर्ता दबला जाणार आहे. कार्यकर्त्याचे फार मोठे खच्चीकरण होणार आहे. पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी भारतीय जनता पक्षाला विधानसभेची उमेदवारी देणे गरजेचे आहे. आणि असा आपला हट्ट आहे, आणि आपली मागणी, आपली भूमिका पक्षाला पटली असावी, असा विश्वासही त्यांना वाटतो आहे. त्यामुळे त्यांनी आता उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये जनसंपर्क वाढवला आहे. मतदारसंघातील वेगवेगळ्या गावांमध्ये समाजकार्यासोबतच राजकीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनाही भेटून ते आपली भूमिका मांडू लागले आहेत. समाजसेवेच्या भावनेने झपाटून काम करणारा एक युवा नेता, आदर्शवादी विचार घेऊन समाजात येत असल्यामुळे लोकांकडूनही विश्वजीत गायकवाड यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. हे चित्र पाहून राजकीय पटलावर तर्कवितर्क जरी लढवले जात असले तरी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी विश्वजीत गायकवाड निश्चितपणे पुढे येणार असल्याचे सांगितले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!