देशाच्या इतिहासात महाराष्ट्रातील महिलांचे मोठे योगदान – राष्ट्रपती महामहीम द्रौपदीताई मुर्मू
देशाच्या इतिहासात महाराष्ट्रातील महिलांचे मोठे योगदान – राष्ट्रपती महामहीम द्रौपदीताई मुर्मू
उदगीर (एल. पी. उगिले) : देशाच्या इतिहासाच्या जडणघडणीकडे पाहिल्यास महाराष्ट्रातील महिलांचे योगदान फार मोठे आहे. जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले, सावित्रीबाईंनी महिला शिक्षणाची दारे खुली केली, संत बहिणाबाईंनी भक्ती रसाची पेरणी केली, तर बहिणाबाई चौधरी या कवयित्रींनी महिलांचे आणि मनाचे भाव साहित्यामध्ये टिपण्याचे मोठे काम केले, सिंधुताई सपकाळ यांनी हजारो अनाथांची आई म्हणून मातृत्वाचे, वात्सल्याचे दर्शन समाजाला घडवले. अशा मातृशक्तीने महाराष्ट्र संपन्न झालेला आहे. देशाच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये महिलांचा वाटा मोठा आहे. महिला या देशाच्या अविभाज्य घटक आहेत. देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. या दृष्टीने राज्य सरकार केंद्र सरकार महिलांना सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करत असतानाच आर्थिक स्वावलंबनासाठी ही विविध योजना राबवून आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करत आहेत, ही गौरवाची बाब आहे. असे विचार देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदीताई मुर्मू यांनी उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमात बोलतना व्यक्त केले.
प्रथमतः उदगीर शहरातील तळवेस येथील नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी अतिथी म्हणून राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, क्रीडामंत्री बनसोडे, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सभेला उद्देशून बोलताना त्यापुढे असे म्हणायला की, महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत,ही आनंदाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या पद्धतीने एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते, त्याच पद्धतीने एक महिला जर आर्थिक सक्षम झाली तर ती आपल्या परिवाराला सक्षम बनवते. त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणावर जोर दिला पाहिजे, आणि महिलांनी सामाजिक जाण ठेवत असतानाच आपल्या आरोग्याचे भान ठेवावे असेही आवाहन त्यांनी केले.
पुरुषांनी महिलांच्या क्षमतेप्रमाणे विकास करण्यासाठी त्यांना सहकार्य करावे. आपण आपल्या देशाला मातृभूमी म्हणतो, त्यातच मातेचा सन्मान आहे. ही भावना सर्वांनी ठेवावी. औपचारिक शिक्षणासोबतच स्वावलंबनाचे आणि आत्मविश्वासाचे धडे महिलांना दिले जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंत्री बनसोडे यांनी केले. याप्रसंगी महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात अदिती तटकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही मनोगत व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून सांगितले की आम्ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना आणत आहोत मात्र काँग्रेस त्याला विरोध करत आहे. अशा लोक कल्याणकारी योजनांमध्ये राजकारण आणू नये. समाजामध्ये गैरसमज पसरवू नये असे आवाहन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सविस्तर दिली हे सरकार सर्वसामान्य गोरगरिबांच्या सरकार आहे त्यामुळे ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे त्या ठिकाणी पंचनामे करून मदत केली जाईल अशा आश्वासन दिले.
चौकट…
अजित पवारांची अनुपस्थिती खटकली…
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते. मात्र ते न आल्याने उदगीरकरांचा भ्रमनिरास झाला, उदगीरचे आमदार हे त्यांच्या गटाचे असून देखील ते आले नाहीत, याबद्दल तर्क वितर्क केले जात होते.
चौकट…
मुख्यमंत्र्यांनी दाखवले गाजर…
उदगीर च्या सर्वांगीण विकासासाठी उदगीरला जिल्हा करा, उदगीरला वैद्यकीय महाविद्यालय द्या, अशा स्वरूपाच्या अनेक मागण्या प्रास्ताविकातून ना. बनसोडे यांनी केल्या होत्या. मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या समारोपाच्या वेळी या सगळ्या मागण्या विचारात घेतो, मात्र तुम्ही सदैव बनसोडे यांच्या पाठीमागे राहा. असे सांगून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर या मागण्यांचा विचार केला जाईल असे अप्रत्यक्ष सांगून जणू उदगीरकरांना गाजर दाखवले, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात चालू होती. एवढ्या मोठ्या कार्यक्रमानंतर उदगीरला काहीतरी मिळेल, काहीतरी घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र काहीही घोषणा झाली नाही. त्याबद्दल उदगीरकरांचा भ्रमनिराश झाला.