वसतीगृहात दुसरीतील मुलीचा संशयास्पद मृत्यू, गुन्हा दाखल
वसतीगृहात दुसरीतील मुलीचा संशयास्पद मृत्यू, गुन्हा दाखल
उदगीर (प्रतिनिधी) : येथील जयहिंद पब्लिक स्कूल कॅम्पसच्या होस्टेलमध्ये राहत असलेल्या इयत्ता दुसरीतील सात वर्षीय मुलीचा संशयास्पद रीतीने मृत्यू झाला आहे. या संदर्भात मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, जयहिंद पब्लिक स्कूल कॅम्पसच्या हॉस्टेलमध्ये राहत असलेली अंकिता नागोराव माहोरे या मुलीच्या आकस्मित मृत्यू प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष व हॉस्टेलच्या अधीक्षिका या दोघांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे. सदरील मुलगी ही मोजे नरवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील होती. सकाळी तिला झोपेतून उठवण्यासाठी गेले असता ती कोमात असल्याचे लक्षात आले. तातडीने तिला शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा वैद्यकीय सूत्रांनी तिला तपासून ती मयत असल्याचे घोषित केले.
दरम्यान शहरांमध्ये महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु आल्या असल्याने शहरातील पोलीस यंत्रणा व आरोग्य यंत्रणा त्या कार्यक्रमाच्या दौऱ्यामध्ये व्यस्त होती. त्यामुळे दिवसभर अंकिता ची उत्तरे तपासणी झाली नाही. ही घटना समजताच उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर व नव्यानेच उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रुजू झालेले पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी रुग्णालयास भेट दिली. मृतदेहाची उत्तरिय तपासणी इन कॅमेरा करण्यासाठी मृतदेह लातूर येथे बुधवारी रात्री सव्वा आठ ला रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आला होता.
या संदर्भात मयत अंकिताचे वडील नागोराव देवराव माहोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु. र. न. 493/ 24 कलम 106, 3(5) बी एन एस सहकलम 75 जेजे ॲक्ट प्रमाणे 5 सप्टेंबर रोजी आरोपी सुधीर बाबुराव जगताप व जय हिंद पब्लिक स्कूलच्या अधीक्षिका या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे या अधिक तपास करत आहेत.
