अहमदपूर शहरात श्री गणरायाचे थाटात आगमन; देखाव्यांनी वेधले लक्ष
अहमदपूर तालुक्यात अनेक मंडळांनी केली गणेशाची प्रतिष्ठापना; अहमदपूर शहरामध्ये गणेशाच्या स्वागतासाठी लोटली गर्दी
अहमदपूर (गोविंद काळे) प्रथम तुला वंदितो, कृपाळा. गजानना गणराया. असे म्हणत गणरायाचे अहमदपूर शहरासह तालुक्यात थाटात आगमन झाले. यावेळी विविध सार्वजनिक गणेश मंडळाने व पदाधिकाऱ्यांनी गणरायाच्या स्वागतासाठी साकारलेले विविध देखावे डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. ढोल-ताशाच्या गजरात वाजतगाजत निघालेल्या देखाव्यासह मूर्तीनी अहमदपूरकरांचे लक्ष वेधून घेतले.गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात तालुक्यात लाडक्या गणरायांचे हर्षोल्हासात आगमन झाले. यानिमित्त विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढून बाप्पाचे स्वागत केले.तर घरोघरीही प्रतिष्ठापना करण्यात आली.मागील पंधरवड्यापासून गणेशोत्सवाचे वेध लागले होते. त्यामुळे ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणेश मंडळांनी डेकोरेशन उभारण्यासह श्रीगणेशाच्या मूर्तीची बुकिंगही केली होती.तर बाजारपेठांमध्ये चार दिवसांपासून विविध रुपातील गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवसांपासून बाजारात गर्दी वाढली होती. मूर्तीसह इतर साहित्य खरेदीसाठी बालगोपाळांसह नागरिक गर्दी करीत होते.अहमदपूर शहरात दुपारच्या सुमारास सार्वजिनक गणेश मंडळांच्या वतीने ढोलताशांच्या गजरात मिरवणुका काढून लाडक्या गणरायांचे स्वागत केले. यादरम्यान गुलाल, फुलांची उधळण करीत गणेशभक्तांनी ठेका धरला होता. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात निघालेल्या मिरवणुकांनी शहर व परिसर दणाणून गेला होता. अहमदपूरसह तालुक्यात श्रीगणेशाची हर्षोल्हासात प्रतिष्ठापना करण्यात आली.
ढोलताशा पथक, डफ, झांज, विविध धार्मिक गीतांवर थिरकणारे देखावे यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याचे चित्र अहमदपूरात होते. बाजारपेठेत सकाळपासूनच गणरायची मूर्ती खरेदी करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती.काही सार्वजनिक मंडळांनी याच ठिकाणावरून गणरायाची मूर्ती नेली.