अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावात सोयाबीनचे नुकसान, काही ठिकाणी करपा रोग, कृषी खात्याकडून पाहणी
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील अनेक गावांमधून अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात करपा रोग पडला आहे. तसेच अनेक भागात हाती आलेले सोयाबीन अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. या दोन्ही बाबीचे गांभीर्याने पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ विमा मिळवून द्यावा. अशी आग्रही मागणी विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी गंगापूर भाकसखेडा चे चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांच्यासह अनेक विमाधारक शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि महसूल विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.
शेतकऱ्यांच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करून महसूल विभागाने कृषी विभागाच्या वतीने प्रत्यक्ष पाहणी दौरा काढून कृषी मंडल अधिकारी मधुकरराव मोरे आणि महसूल विभागाच्या वतीने तलाठी अंकुश वडगावे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीनच्या पिकाची पाहणी केली. मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे नुकसान झाले आहे. मात्र यासंदर्भात पाहणी किंवा पंचनामा करायला विनंती करूनही विमा कंपनीचा कोणीही अधिकारी किंवा प्रतिनिधी हजर झाला नसल्याने शेतकरी प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत. शासनाला दिलेल्या या निवेदनावर राम सुभाष जाधव, श्रीधर मोरे, मुरारी जाधव, जनार्दन जाधव, भीमराव जाधव, एकनाथ जाधव, सतीश जाधव, सुरेश जाधव, एकनाथ मोरे, पंढरीनाथ मोरे, धनाजी मोरे, सर्जेराव तोबरे, रमेश तेलंगे, पंडितराव जाधव, ज्ञानोबा जाधव, संजीव टेकपुजे, शिवकुमार टेकपुंजे, भीम जाधव, अशोक त्रंबके, दयानंद मोरे, दौलत जाधव, जगन्नाथ तेलंगे, मारुती खेडकर, धनाजी कांबळे यांच्यासह परिसरातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा मिळवून द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांना पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही सदरील निवेदनात देण्यात आला आहे. शासनाने गेल्या वर्षीचा ही विमा अद्याप दिलेला नसल्याने यापूर्वीच चेअरमन संघटनेच्या वतीने उदगीर शहरात मोठे आंदोलन झाले होते. त्या आंदोलनानंतर अद्यापही या संदर्भात कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यात पुन्हा अतिवृष्टीने चालू हंगामातील ही सोयाबीन अगदी हाताला आले असताना मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने गेल्या हंगामातील आणि चालू हंगामातील विमा तात्काळ शेतकऱ्यांना द्यावा. अशी मागणी युवा नेते विवेक पंडितराव जाधव यांनी केली आहे.