पत्नीसह इतर चौघांनी पतीच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकल्याप्रकरणी; अहमदपूर पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल….
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील आदर्श कॉलनी मध्ये दि.५ सप्टेंबर रोजी रात्री ७ च्या सुमारास पत्नी, तिचा भाऊ, व अन्य तीन बहिणींनी संगणमत करून पती गोविंद भगवान भिकाणे यास घरी बोलावून चेहऱ्यावर व डोळ्यात मिरची पूड फेकून डोळ्यात सुया मारून चेहऱ्यावर ऍसिड टाकल्याची फिर्याद गोविंद भगवान भिकाने यांनी लातूर शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना अहमदपूर पोलिसांना दिली. या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसांनी पत्नी, तिचा भाऊ, व अन्य तीन बहिणीवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अहमदपूर पोलीसात गोविंद भगवान भिकाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी आणि माझी पत्नी सोनाली भिकाणे मुलांच्या शिक्षणासाठी अहमदपूर शहरातील लेक्चरर कॉलनी मध्ये राहत होतो. मागील पंधरा दिवसांपूर्वी आमच्या पती-पत्नीत भांडण झाले होते. त्यामुळे आमचे पटत नसल्याने मी हिंपळनेर ता. चाकूर या माझ्या गावी राहू लागलो होतो. परंतु दि. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास माजी मेहुणी अश्विनी खंदाडे यांनी फोन करून मला सांगितले की तुमची पत्नी सोनाली ही माझ्या घरी अहमदपूरला आली आहे. विषारी औषध पिऊन मरते असे म्हणत आहे, तुम्ही लवकर अहमदपूरला येऊन तिला घेऊन जा असे सांगितले. त्यावेळी मी माझी दुचाकी गाडी घेऊन अहमदपूर येथील आदर्श कॉलनीत मेहुणी अश्विनी खंदारे च्या घरी गेलो असता मेहुणी अश्विनीने माझ्या चेहऱ्यावर, डोळ्यात मिरची पूड फेकली. पत्नी सोनालीने डोळ्यात सुयाने वार केले. दोन्ही डोळ्यातून रक्त निघू लागल्यामुळे मी जोरजोरात ओरडू लागलो, तेवढ्यात माझा मेहुना गोपाळ बाबुराव ऐलाने व मेहुणी अनुराधा पेटेवाड आणि माळेगावची मेहुणी नागमोडे तेथे आले. त्यानंतर मेव्हणा व दोन्ही मेहुण्यांनी मिळून लाकडांनी माझ्या पायावर, पाठीस, मानेवर मारहाण केली. तर मेहुण्याने माझ्या तोंडाला ओरडू नकोस म्हणून काड्याने गच्च बांधले. व माझ्या चेहऱ्यावर ऍसिड टाकले ते ऍसिड दोन्ही डोळ्यात गेल्यामुळे भयानक आग होत होती. त्यानंतर मी बेशुद्ध झालो. दुसऱ्या दिवशी ११ च्या सुमारास मला होश आली तेव्हा मी सरकारी दवाखाना लातूर येथे असल्याचे समजते. माझा मोबाईल, जवळील १५ हजार रुपये चेक केले असता दिसून आले नाहीत. माझ्यावर सरकारी दवाखाना लातूर येथे उपचार चालू आहे अशी तक्रार गोविंद भिकाने यांनी अहमदपूर पोलिसांना दिली.
वरील तक्रारीवरून अहमदपूर पोलिसांनी पत्नी सोनाली भिकाणे, मेहुणी अश्विनी खंदाडे, अनुराधा पेद्देवाड, माळेगावची नागमोडे आणि मेहुणा गोपाळ बाबुराव ऐलाने यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ०५३२/२४ कलम भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३ १२४(१), १२४(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अहमदपूर पोलीस करत आहे.