मशनरी तर सोडाच भंगाराचा एक कणही हलू देणार नाही , डेरी पुनर्जीवन समितीचा निर्णय
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील शासकीय दूध डेरी आणि दूध भुकटी प्रकल्प भंगारात काढून, तो विक्रीचा डाव सरकारने टाकला आहे. यात दूध डेरी आणि दूध भुकटी प्रकल्पात च्या भंगार विक्रीची निविदा काढण्यात आली असून सदरील निविदा “शारदा टेक्नो स्पेशलिटीज प्रा. लि. कोल्हापूर यांना मंजूर झाली आहे. एक कोटी एक लाख 14 हजार रुपयाची निविदा मंजूर करण्यात आल्याने, सदरील कंपनीचे प्रतिनिधी उदगीर येथे येऊन शासकीय दूध भुकटी प्रकल्पाची मशिनरी आणि इतर साहित्य घेऊन जाण्यासाठी आले होते. सदरील माहिती शासकीय दूध योजना पुनर्जीवन समितीच्या पदाधिकाऱ्यांना समजल्यानंतर तातडीने सर्व प्रतिनिधींनी आणि उदगीरच्या हितीचिंतकांनी शासकीय दूध योजना येथे जाऊन संबंधित कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यापूर्वी अशाच आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी आणि शासकीय दूध योजनेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहे. त्याची प्रत या संबंधितांना देऊन उदगीर येथून प्रकल्पाची मशनरी तर सोडाच भंगाराचा एक कणही येथून हलू देणार नाही अशी आक्रमक भूमिका या समितीच्या सदस्यांनी घेतली आहे.
उदगीर पंचक्रोशीच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी ही शासकीय दूध योजना सुरू केली. त्यानंतर या योजनेची भरभराट होऊ लागल्यानंतर सन 1979 मध्ये दूध भुकटी प्रकल्प सुरू झाला. तो प्रकल्प 2002 पर्यंत सुरळीत सुरू होता, मात्र नंतर घरघर लागली आणि तो बंद पडला. हा प्रकल्प सुरू व्हावा म्हणून पुन्हा नव्या जोमाने नोव्हेंबर 2008 मध्ये तत्कालीन आमदार स्व.चंद्रशेखर भोसले यांनी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांच्याकडे पाठपुरावा आणि आंदोलन करून पुन्हा या प्रकल्पासाठी निधी मंजूर करून आणला, आणि प्रकल्प सुरू केला. मात्र तत्कालीन काही अधिकाऱ्यांना हा प्रकल्प नको वाटत होता. परिणामत: हा प्रकल्प पुन्हा बंद पडला की पाडला गेला? या संदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात. तसे असले तरी तो प्रकल्प बंद पडल्यानंतर पुन्हा तो प्रकल्प सुरू व्हावा अशा पद्धतीची हालचाल फारशा ताकतीने कोणीही केली. नाही.
2019 च्या निवडणुकीच्या दरम्यान विद्यमान आमदार तथा राज्याचे क्रीडामंत्री यांनी आपल्या जाहीरनाम्यात सदरील योजना पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते. मात्र दुर्दैवाने त्यांचे आश्वासन हवेतच विरले, की त्यांना विसर पडला? माहिती नाही. मात्र हा प्रकल्प जो दररोज एक लाख वीस हजार लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमतेचा होता, तसेच मलई विरहित दूध आणि दररोज 11 टन 70 किलो दूध भुकटी निर्मितीची क्षमता होती. तर पांढरे लोणी पाच टन परिसरातील जिल्ह्यामध्ये जात होते, आणि त्या ठिकाणाहून कच्चे थंड केलेले दूध भुकटी प्रकल्पासाठी येत होते. जवळपास साडेपाचशे कर्मचारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या प्रकल्पावर अवलंबून होते, शेकडो शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचा कणा होता मात्र हा प्रकल्प सध्या शासनाने भंगारात काढून एक कोटी एक लाख 14 हजार रुपयांमध्ये विक्री केला आहे.
चौकट……
मंत्री महोदयांना वेळ नाही….
शेकडो लोकांच्या प्रत्यक्ष उदरनिर्वाहाचे साधन आणि शेकडो शेतकऱ्यांना दूध उत्पादनाचा जोडधंदा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आज भंगारात जातो आहे. मात्र प्रकल्प पुन्हा सुरू करावा अशी राजकीय इच्छाशक्ती कोणाकडेही नाही. हे दुर्दैवाने उदगीरची जनता बोलू लागली आहे. यासंदर्भात माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांच्याकडे सतत पाठपुरावा करून त्यांना उदगीर येथे स्वतः येण्याचे निमंत्रण देऊन त्यांना घेऊन उदगीरला आले होते, आणि त्यांच्याकडून पाठपुरावा केला होता. त्यांनी देखील महाराष्ट्र शासनाकडे या संदर्भात पत्रव्यवहार केला होता. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. परिणामतः हा प्रकल्प भंगारात काढण्यात आला आहे.
चौकट……
चांगल्या मशनरी भंगारात काढण्याचा कुटील डाव…..
या प्रकल्पात काम केलेल्या एका अनुभवी अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की, एका धातुशास्त्र अभियंत्याच्या सांगण्यानुसार एखाद्या मशनरी मधील एखादा पार्ट खराब झाला म्हणून तो संपूर्ण प्रकल्प भंगार मध्ये काढणे अत्यंत चुकीचे आहे. किंबहुना एखाद्या खाजगी दूध डेरी प्रकल्पाला हातभार लावावा अशा कुटिल गावातून एवढा मोठा प्रकल्प कुणाच्यातरी घशात उतरवला जातो आहे की काय? अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. कारण या प्रकल्पाची जमीन आज कोट्यावधी रुपयांच्या किमतीची झाली आहे. शहराच्या मध्यवस्तीत आलेली तेरा एक्करहुन अधिक जमीन हडपण्याचाही काही लोक डाव टाकत असल्याचे बोलले जात आहे.
मध्यंतरीच्या काळात शासनाने हा प्रकल्प खाजगी डेरीकडे देण्याचा प्रयत्न केला होता. त्यालाही या शासकीय दूध डेरी पुनर्जीवन समितीने विरोध केला होता. शासकीय अनास्था, लोकप्रतिनिधीची उदासीनता, यामुळे उदगीर परिसरातील एक मोठा प्रकल्प आज मातीमोल विकला जातो आहे. हे उदगीर परिसरातील जनतेचे दुर्दैवच आहे.
चौकट…..
यांनी रोखली भंगार घेऊन जाणारी प्रक्रिया…
शासकीय दूध योजना पुनरुज्जीवन समितीचे विधीज्ञ नरेश सोनवणे, मोतीलाल डोईजोडे, आशिष पाटील राजूरकर, माजी नगरसेवक अहमद सरवर, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव मुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, प्रा एस एस पाटील, महिला आघाडीच्या नेत्या अरुणाताई लेंडाने, युवक काँग्रेसचे नेते श्रीनिवास एकुरकेकर यांच्यासह उदगीर शहरात हा प्रकल्प कायम राहावा, अशी अपेक्षा असलेले अनेक तरुण उपस्थित होते. त्या सर्वांनी संबंधितांना पत्र देऊन, प्रकल्प पुन्हा सुरू झाल्याशिवाय किंवा नव्याने योजना मंजूर झाल्याशिवाय येथून भंगार आणि मशिनरी काहीही घेऊन जाऊ नये. अशी विनंती केली आहे.