युवक, युवती बलवान तरच राष्ट्र शक्तीमान – विश्वजीत गायकवाड

0
युवक, युवती बलवान तरच राष्ट्र शक्तीमान - विश्वजीत गायकवाड

युवक, युवती बलवान तरच राष्ट्र शक्तीमान - विश्वजीत गायकवाड

उदगीर (प्रतिनिधी) : राष्ट्राला खऱ्या अर्थाने शक्तिमान बनवायचे असेल तर या राष्ट्रातील ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणी यांचा बौद्धिक आणि शारीरिक योग्य विकास होणे गरजेचे आहे. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून इंजी. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशन च्या वतीने गाव पातळीवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र काढून वाचनालय सुरू करण्यात येत आहे. तसेच शारीरिक मेहनतीची सवय तरुणांना लागावी, यासाठी व्यायाम शाळा काढून वेगवेगळ्या स्पर्धेसाठी जे व्यायाम आवश्यक आहेत, त्या व्यायामाचे साहित्य गावोगावी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न फाउंडेशन करत आहे. यातून ग्रामीण भागातील जे सुशिक्षित तरुण आहेत, ते व्यसनाधीनतेकडे न वळता अभ्यासाकडे वळतील, तसेच सध्या मैदानी खेळ बंद असल्याने मोबाईल आणि संगणकाच्या खेळामध्ये विद्यार्थी रमत आहेत. त्या ऐवजी त्यांना व्यायाम शाळेत जाऊन व्यायाम करावा, अशा पद्धतीची प्रेरणा मिळावी म्हणून गोळाफेकीचे गोळे तसेच डंबेल्स आणि इतर साहित्य व्यायाम शाळेच्या माध्यमातून फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणार आहे.
फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यादृष्टीने उदगीर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वे करून योग्य जागी वाचनालय आणि व्यायाम शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने कामाला लागावे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाचा विकास म्हणजेच देशाचा विकास आहे, आणि या विकसित देशांमध्ये सबल तरुण असले पाहिजे. त्यासाठी व्यायाम शाळा खूप गरजेच्या आहेत. याचेही जनजागरण गावागावातून केले जावे. असे आवाहन इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशनचे प्रमुख इंजि. विश्वजीत गायकवाड यांनी केले आहे.
ते फाउंडेशन च्या वतीने राबवल्या जाणाऱ्या आगामी उपक्रमाच्या संदर्भात कार्यकर्त्यांना माहिती देत असताना बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी नगरपालिकेचे माजी सभापती नागेश अष्टुरे हे होते.
पुढे बोलताना इंजि. विश्वजीत गायकवाड म्हणाले की, आपण फाउंडेशनच्या माध्यमातून समाज हिताच्या ज्या ज्या योजना राबवत आहोत, त्या त्या योजनांची माहिती त्या भागातील जनतेला द्या. जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांशी आपला संपर्क होईल, कारण आपण ग्रामीण भागातील महिलांच्या रोजगारासाठी प्राधान्याने शिलाई मशीनचे वाटप आणि प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करत आहोत, मागील काळामध्ये आपण जवळपास 300 महिलांना प्रशिक्षित केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी शिवलेल्या कापडी पिशव्या ही फाउंडेशनने खरेदी केल्या आहेत. त्यामुळे त्या महिलांना रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. ज्या पद्धतीने महिला स्वावलंबनाचा एक टप्पा आपण गाठला आहे. त्याच पद्धतीने युवकांच्या आणि युवतींच्या स्वावलंबनाच्या दृष्टीने देखील आपण वेगवेगळे प्रकल्प हाती घेणार आहोत. त्या अनुषंगाने जनतेची मते जाणून घ्या, त्यांच्या सूचना घ्या, आणि त्या फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचवा. असेही आवाहन इंजि. विश्वजीत गायकवाड यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *