जमिनी हलक्या असूनही शंभर टक्के वसुली : आ. बाबासाहेब पाटील
३९ चेअरमन व गटसचिवांचा सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, शेतकरी कष्टाळू आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या नशिबी जमिनी या हलक्या प्रतिच्या आहेत. तरीही त्यांची जिद्द, चिकाटी, दिवस-रात्र मेहनत करून, रक्ताचे पाणी करून बँकेकडून कर्ज उचल केलेल्या रकमेची वेळेवर परतफेड करतात म्हणून ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.
दि. ९ स्पटेंबर रोजी तालुक्यातील ३९ सोसायट्यांनी बँकस्तरावर शंभर टक्के वसुली केल्याबद्दल विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, गटसचिवांच्या सन्मान प्रसंगी ते बोलत होते. मंचावर राष्ट्रवादी काग्रेसचे सरचिटणीस शिवानंद हेंगणे, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे, शिवाजी देशमुख, अझहर बागवान, बँकेचे तालुका फिल्ड ऑफीसर
अतूल देशमुख आदींची उपस्थिती होती. प्रारंभी आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ३९ चेअरमन व गटसचिवांचा सत्कार करण्यात आला.
आ. पाटील म्हणाले, अहमदपूर तालुक्यात ७० विविध कार्यकारी सोसायट्यांना २१४.१९ कोटी रुपये मागील वर्षी कर्ज वाटप करण्यात आले होते. त्यापैकी जून अखेरपर्यंत २०४.५१ कोटी रुपये वसूल झाले असून याचे प्रमाण ९५ टक्के होते. ही अभिमानाची बाब आहे. अहमदपूर शहर शाखेशी संलग्न असलेल्या ६ संस्था, अहमदपूर शाखा ८ सोसायटी, शिरुर ताजबंद ६, हडोळती २, अंधोरी ४, सताळा २, खंडाळी ४, किनगाव ६, सावरगाव रोकडा १ अशा एकूण ३९ संस्थांनी १०० टक्के वसुली बँकस्तरावर दिली, त्या चेअरमन, गटसचिव व शेतकऱ्यांचे अभिनंदन. बाकीच्या संस्थानी पण चांगली वसुली केली, एक दोन टक्के वसुली कमी झाल्याने त्या संस्था शंभर टक्के वसुलीत आलेल्या नाहीत.
परंतु त्यांनी चांगले काम केले. बँके मार्फत शुभमंगल, मोटार पाईप लाईन कर्ज, ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज, बचत गटानां कर्ज, तर नविन तंत्रज्ञानाचा आधार घेत मोबाईल योजना, एटीएम योजना नव्याने
बँक राबवत आहे. लाडक्या बहिण योजनेसाठी ० बॅलेन्सवर खाते काढून दिले, कर्मचाऱ्यांचा व निराधारांना पण आधार देण्याचे काम लातूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख, अध्यक्ष आमदार धीरज देशमुख, उपाध्यक्ष प्रमोद जाधव व सर्व संचालकांच्या सहकार्याने आम जनतेला कर्ज वाटपा सोबतच ईतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आमच्या बँकेचे अधिकारी, कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करतात. त्यांच्या प्रयत्नांना चेअरमन, गटसचिवांनी साथ दिल्याने अहमदपूर तालुक्यात ९५ टक्के वसुली कर्जाची झाल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाखा तपासनीस अविनाश माने, किशोर चव्हाण, पांडुरंग चाकूरकर, संभाजी बेलगावकर, सिद्धेश्वर मिरकले, ज्ञानोबा शिंदे, नारायण कांबळे, हणमंत मंदाडे यांनी प्रयत्न केले. प्रास्तविक एस. के. बेलगावकर तर सुत्रसंचलन दयानंद मुंढे यांनी केले. कार्यक्रमास ७० सोसायट्यांचे चेअरमन व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.