श्री गणेश विसर्जनासाठी महापालिकेची तयारी पूर्ण
शहरवासियांसाठी १५ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र
प्रदूषण टाळत मूर्ती संकलन केंद्रातच देण्याचे आवाहन
मुर्ती संकलनासाठी ३९४ अधिकारी /कर्मचाऱ्यांची नियुक्ती
लातूर (प्रतिनिधी) : प्रदूषण टाळण्यासाठी शहरातील नागरिकांनी आपाल्या घरी स्थापित केलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन जलाशयात न करता मनपाच्या संकलन केंद्रांकडे त्या मुर्ती द्याव्यात.सार्वजनिक गणेश मंडळांनी १२ नंबर पाटी येथील खदानीत विसर्जन करावे,असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.मुर्ती संकलनासाठी पालिकेकडून ३९४ अधिकारी/कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शनिवार दि. ७ सप्टेंबर रोजी स्थापित केलेल्या श्रीगणेशाचे मंगळवारी (दि.१७ सप्टेंबर )विसर्जन होणार आहे.शहरातील नागरिक व भक्त गणरायाला निरोप देणार आहेत.प्रथेप्रमाणे श्रीगणेशाच्या मुर्तीचे जलाशयात विसर्जन केले जाते.गेल्या कांही वर्षांपासून प्रदूषण टाळण्यासाठी मनपा गणेश मूर्ती संकलन केंद्र कार्यान्वित करते.यातून प्रदूषणाला कांही अंशी प्रतिबंध करता येऊ शकतो.गणेशभक्तांनी आपल्या मुर्ती संकलन केंद्रात देण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांना आपल्या मोठ्या मूर्तीचे १२ नंबर पाटी जवळील खदानीत विसर्जन करता येणार आहे.यासाठी संबंधित मंडळांनी स्वतःच्या वाहनाने मूर्ती तेथपर्यंत आणाव्यात.श्री सिध्देश्वर मंदीर परिसर,कव्हा रोड, बांधकाम भवन या ठिकाणी मिरवणुकी नंतर श्री गणेश मुर्तीचे संकलन करण्यात येणार आहे.
घरगुती गणेश मंडळांसाठी मनपाकडून शहरात १५ ठिकाणी संकलन केंद्र उभारण्यात आली आहेत.या ठिकाणी मनपाचे कर्मचारी दिवसभर उपस्थित राहून मुर्तींचे संकलन करणार आहेत.नांदेड रस्त्यावर यशवंत शाळा,विवेकानंद चौकातील पाण्याची टाकी,मंठाळे नगरमध्ये मनपा शाळा क्रमांक ९, सिध्देश्वर मंदिर, जिल्हाधिकारी कार्यालया जवळील शासकीय विहीर,बार्शी रस्त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाण्याची टाकी,दयानंद महाविद्यालयाचा पार्किंग परिसर,सरस्वती कॉलनीतील पाण्याची टाकी,टाऊन हॉल, बांधकाम भवन,कव्हा रस्त्यावर खंदाडे नगर, साळे गल्लीतील यशवंत शाळा,तिवारी यांची विहीर,गणेश नगर व काशी विश्वेश्वर मंदिर ग्रीन बेल्ट या ठिकाणी यावर्षी मूर्ती संकलन केंद्र उभारली जाणार आहेत.
श्री गणेश विसर्जना वेळी आपल्याकडील गणेश मूर्ती मनपाने उभारलेल्या संकलन केंद्रात द्याव्यात. पालिकेकडून या सर्व मूर्तींचे १२ नंबर पाटीवरील खदानीत विधीवत विसर्जन केले जाणार आहे.नागरिक व गणेश भक्तांनी या उपक्रमात मनपाला सहकार्य करावे.प्रदुषणाला आळा घालण्यास सहकार्य करावे,असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.