भक्तिमय वातावरणात बाप्पांना निरोप
अहमदपूरात विसर्जन मिरवणूक शांततेत : फुले, गुलालाची केली उधळण
अहमदपूर (गोविंद काळे) : डिजे, ढोल-ताशे व बँडचा निनाद, लक्षवेधी व जनजागृतीपर देखाव्यांचे चित्ररथ आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर
याचा जयघोष फुले व गुलालाची उधळण अशा उत्साह आणि भक्तिपूर्ण वातावरणात अहमदपूरकरांनी लाडक्या बाप्पाला मंगळवार १७ सप्टेंबर रोजी निरोप दिला. या विसर्जन मिरवणुकीत मंडळे, गणेशभक्तांचा मोठा जल्लोष दिसून आला. सार्वजनिक मंडळांनी वेळेचे बंधन पाळत गणरायाचे विसर्जन केले. विसर्जन मिरवणुकीसह गणेशोत्सव शांततेत साजरा झाला.दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर अनंत चतुर्दशीला घरोघरी विराजमान गणराय तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करीत उत्साहाच्या वातावरणानंतर आबालवृद्धांनी बाप्पाला निरोप दिला.शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक लक्षवेधी ठरली.शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांसह परवानगीशिवाय स्थापन केलेल्या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीस सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली.
मिरवणुकीत डिजे,ढोल-ताशे व बँडच्या तालावर गणेशभक्तांनी प्रचंड
उत्साहात जल्लोष साजरा केला. गणेश मंडळांनी मिरवणूकीत विविध देखावे सादर केले. मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा नागरिकांची मोठी उपस्थिती होती. नगरपालिकेच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात स्वागतकक्ष उभारण्यात आले होते.शहरातील सर्वच गणेश मंडळाचे स्वागत करण्यात आले.
शहरात विसर्जन शांततेत
शहरात गणेश विसर्जन सोहळा शांततेत पार पडला.सार्वजनिक गणेश मंडळांनी सजविलेल्या वाहनांवर श्रींची मूर्ती ठेवून वाजतगाजत विसर्जन मिरवणूक काढत नियोजित ठिकाणी श्रींचे विसर्जन केले.या सोहळ्यात गणेशभक्तांनी प्रचंड उत्साहात सहभाग नोंदविला होता.
अहमदपूर शहर पोलिस ठाणे हद्दीत ७३ गणेश मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली होती. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोठा फौजफाटा तैनात होता. उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कल्याणकर, पोलिस निरीक्षक बि.डी. भूसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली ६ पोलिस अधिकारी, ४० पोलिस कर्मचारी, ६३ होमगार्ड, १ एसआरपी सेक्शन असा फौजफाटा होता.पोलिस प्रशासनाकडून मिरवणूक मार्गावर जागोजागी पोलिस कर्मचारी, होमगार्डस् तैनात केले होते.टेंभूर्णी तलावात विसर्जन करण्यात आले.