महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात ‘प्रकृति, पर्यावरण एवं आपदा प्रबंधन’ जनजागृती अभियानाचे आयोजन
उदगीर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील उदयगिरी महाविद्यालयात “प्रकृति, पर्यावरण एवं आपदा प्रबंधन जनजागृती अभियान” अंतर्गत पियुष भाई यांनी आपल्या महत्वपूर्ण भाषणातून उपस्थित विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमात त्यांनी नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सज्ज असण्याचे आवाहन केले.
त्यांनी आपल्या भाषणात निसर्गसंवर्धन, पाण्याचा योग्य वापर, वनीकरण आणि जैवविविधतेचे जतन या मुद्द्यांवर विशेष भर दिला. तंत्रज्ञानाच्या मदतीने पर्यावरण रक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी बनवण्याचे महत्त्व त्यांनी विषद केले. कार्यक्रमात अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी पाण्याचे संरक्षण आणि त्याचे शाश्वत व्यवस्थापन, जैवविविधतेचे रक्षण आणि वनीकरणाचे महत्त्व, आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजना आणि जागरूकता वाढवणे याविषयी माहिती दिली. ब्रह्मकुमारी ज्योती दीदी यांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ दिली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य मस्के म्हणाले की, पर्यावरण आणि मानवी सकारात्मक विचार यांची सांगड घालणे आवश्यक आहे.
यावेळी विष्णु भाई, किरण भाई, दुर्गा दीदी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टाफ सेक्रेटरी ग्रंथपाल डॉ.एल.बी. पेन्सलवार यांनी केले तर आभार प्रा.डॉ.व्ही.एस.नागपूर्णे यांनी मानले.