किमान यावर्षीतरी सरकार शेतकऱ्यांना न्याय देणार का ? – विवेक पंडितराव जाधव
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यात खरीप हंगाम २०२४ मध्ये झालेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन पिक पिवळे पडले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. तालुक्यातील चेअरमन संघटनेचे पिकविमा प्रश्नासंदर्भात गेल्या ३ महिन्यापासून आंदोलन चालू आहे. शेतकरी न्याय मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या पिकविम्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.
शेतकरी न्याय मोर्चाचे प्रवक्ते तथा गंगापूर भाकसखेडा सोसायटीचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी दि. २२ सप्टेंबर, रविवारी तालुका कृषी अधिकारी व विमा प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीने दिनांक २० सप्टेंबर पर्यत करणे अपेक्षित होते. त्यांनी तसे अद्याप केले नाही, याउलट गावागावात त्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांकडून पंचानामा करण्यासाठी पैश्याची मागणी करत आहेत, पंचनामा करतेवेळी कृषी सहाय्यक तिथे उपस्थित असणे आवश्यक आहे. तरीपण त्यांना कसलीच कल्पना न देता परस्पर गावातील शेतकऱ्यांकडे जाऊन ज्यांनी पैसे दिले त्यांचेच पंचनामे करण्यात येणार आहेत, असे सांगून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करीत आहेत. २०२३ प्रमाणेच गावातील मोजक्याच शेतकऱ्यांची नावे घेऊन बाकीच्या शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवण्याचा कट कंपनी रचत आहे का? याकडे येथील मंत्र्यांचे लक्ष नाही का ? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.
तसेच, विमा कंपनीचा हा भोंगळ कारभार सुरु असताना, गेल्यावर्षीचा विमा आजतागायत आला नसताना किमान यावर्षीच्या पिकविम्यासाठी तरी उदगीरच्या लोकप्रतिनिधीनी याकडे गांभीर्याने पहिले पाहिजे, २०२४ च्या सोयाबीन पिकविम्यासाठी कसल्याच प्रकारचे पंचनामे न करता, सरसकट तालुक्यातील सर्व मंडळात सोयाबीन पिकाचा २०२४ खरीप हंगामाचा विमा कोणत्या पद्धतीने जाहीर करता येईल यासाठी मंत्री ना.संजय बनसोडे यांनी तालुक्यात नुकसानग्रस्त परिस्थिती जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. असे निवेदन त्यांना देऊन, आपण किमान यावर्षीतरी विमा मंजूर करून शेतकऱ्यांना न्याय देणार का? असा प्रश्न विचारणार असल्याची माहितीही विवेक पंडीतराव जाधव यांनी दिली.