उदगीर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अवैध गर्भपात करताना रंगेहात पकडले, दोघांवर गुन्हे दाखल

0
उदगीर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अवैध गर्भपात करताना रंगेहात पकडले, दोघांवर गुन्हे दाखल

उदगीर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अवैध गर्भपात करताना रंगेहात पकडले, दोघांवर गुन्हे दाखल

उदगीर (एल. पी. उगिले) : तालुक्यातील ठिकठिकाणी बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याची चर्चा असून शहरांमध्ये देखील काही व्यक्ती कोणतेही अधिकृत वैद्यकीय क्षेत्राची नोंदणी नसताना किंवा वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारा कोणताही कोर्स केलेला नसताना, बिनधास्तपणे क्लिनिकचा बोर्ड लावून सर्वसामान्य जनतेच्या जीवितासी खेळत असल्याचे आढळून येत आहे. अशाच एका दवाखान्यात अवैध पद्धतीने गर्भपात केला जात असताना दोघांना रंगेहात पकडून त्यांच्यावर रीतसर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या संदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, उदगीर शहरातील बनशेळकी रोड परिसरातील आफीया क्लिनिक नावाच्या दवाखान्यामध्ये एका महिलेचा गर्भपात सुरू असल्याची माहिती उदगीर येथील सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पांडुरंग दोडके यांना निणावी फोन द्वारे मिळाली. त्याची खात्री करण्यासाठी त्यांनी आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधून आपल्या सोबत स्त्रीरोगतज्ञ डॉ. आरती वाडीकर आणि रुग्णालयाच्या कायदेशीर सल्लागार विधीज्ञ अनिता मेकले आणि त्यांचे कर्मचारी यांना सोबत घेऊन पोलीस प्रशासनाला या संदर्भात कळवून, मिळालेल्या माहितीच्या आधारे अफिया क्लिनिक बनशेळकी रोड येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी साडेतीन ते चार महिन्याच्या गरोदर असलेल्या महिलेचा गर्भपात केला जात असल्याचे डॉक्टरांच्या पथकाला आढळून आले. सदरील महिलेचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. तिला तातडीने शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. संबंधित डॉक्टर म्हणून घेणाऱ्या आरिफुद्दीन उर्फ इरफान एस मोमीन रा. बाबा नगर, निडेबन, उदगीर आणि फरजाना सुलतान खान पठाण यांना रुग्णालयाच्या नोंदणीचे कागदपत्र विचारले असता तशा पद्धतीची कोणतीही नोंदणी झाल्याचे कागदपत्र त्यांच्याकडे आढळून आले नाहीत. तसेच सदरील महिलेचा गर्भपात करण्यासाठी उपयोगात येणारे वैद्यकीय साहित्य आणि औषध, गोळ्या यादेखील पोलीस प्रशासनाने जप्त केल्या आहेत. पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण येथे गुरन 527/ 24 कलम 91, 92, 105 भारत न्याय संहिता सहकलम महाराष्ट्र सुश्रुषा गृह अधिनियम 1949 चे कलम 6, 12 सह कलम वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 चे सुधारित 2002 चे कलम 5 (2)(3)(4) अन्वये सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पांडुरंग दोडके यांच्या फिर्यादीवरून आरोपी डॉ. अरिफुद्दीन उर्फ इरफान एस मोमीन आणि फरजाना सुलतान खान पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवकते हे अधिक तपास करत आहेत.

चौकट……
पुन्हा गर्भलिंग निदान जोमात, प्रशासन कोमात…..

उदगीर शहरामध्ये काही गर्भलिंग निदान केंद्रामध्ये जाहीरपणे पाटी गर्भलिंग निदान केले जाणार नाही, गर्भलिंग निदान करणे गैर कायदेशीर आहे अशी पाटी जरी लावली असली तरी ग्रामीण भागातून येणाऱ्या आणि सीमा भागातील महिलांची सर्रास गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याची चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे. या प्रकरणातील महिलेने नेमके कोणत्या गर्भलिंग निदान केंद्रात जाऊन तपासणी केली होती? या संदर्भातही आता पोलीस तपासाला दिशा मिळत असून सदरील गर्भलिंग निदान करण्याचा सल्ला कोणत्या डॉक्टरांनी दिला होता? हेही आता उघड होणार आहे. या प्रकरणात अनेक मोठमोठ्या डॉक्टरांची नावे चर्चिले जात आहेत, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

चौकट…..
काही वर्ष कंपाउंडरकी केलेला बनला डॉक्टर….

या प्रकरणातील अफिया क्लिनिक मध्ये पोलीस प्रशासनाने जप्त केलेल्या कागदपत्रामध्ये उदगीर शहरातील एका ख्यातनाम स्त्रीरोग तज्ञाकडे डॉ. अरिफुद्दीन उर्फ इरफान एस मोमीन हा काही वर्ष कंपाउंडर म्हणून काम करत असल्याचे प्रमाणपत्र आढळून आले आहे. म्हणजेच फक्त कंपाउंडरकी करणारा, आपल्याला अनुभव आला असे समजून डॉक्टर बनल्याचे हे जिवंत उदाहरण आहे. अशाच पद्धतीने ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर फिरत असल्याची चर्चा आता शहरात सर्रास चालू आहे.

गर्भलिंग निदानासाठी सीमा भागातून मोठी गर्दी….

उदगीर शहर हे आंध्र, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र या चार राज्याच्या सीमेवर असल्यामुळे या भागातून मोठ्या प्रमाणात गर्भलिंगनिदान चाचणी करण्यासाठी महिला उदगीर शहराचा आधार घेत असल्याची चर्चा चालू आहे. गर्भलिंग निदानासाठी आणि स्त्रीभ्रूण हत्या करण्यासाठी कोण प्रवृत्त करत आहे? याचाही शोध आता पोलीस प्रशासन करू लागले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *