सकल मराठा समाजाच्या उदगीर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
उदगीर (प्रतिनिधी) : मराठा समाजाला ओबीसी कोठ्यातून आरक्षण मिळावे म्हणून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसल्याने, त्यांचे प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मात्र भारतीय जनता पक्षाला त्यांच्या बद्दल कोणतीही सहानुभूती नाही. हे आता सिद्ध झाले आहे. उपोषणामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे म्हणून उदगीर तालुका व शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने उदगीर बंदचे आवाहन केले होते. याला उदगीरच्या जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरोग्य सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाचे आंदोलक यात सहभागी झाले होते. मराठा आंदोलकांची पायी व मोटार सायकल रॅली उदगीर शहरातील मुख्य रस्त्यावरून निघाली होती. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शाहू महाराज चौक, कॅप्टन कृष्णकांत चौक, नाईक चौक, आप्पाराव पाटील चौक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, उमा चौक, उदयगिरी कॉलेज, शिवाजी महाविद्यालय, आडत लाईन, हवगी स्वामी कॉलेज, रिंग रोड, शाहू कॉलनी, जळकोट रोड, देगलूर रोड, बिदर रोड, नांदेड रोड, उदगीर बस स्थानक, मुख्य बाजारपेठ, अण्णाभाऊ साठे चौक, व्यापारी अडत लाईन, कापड दुकानदार, हनुमान मंदिर चौक, चौबारा, हावगी स्वामी मठ मंदिर, सद्गुरु उदागीर बाबा मंदिर, हनुमान कट्टा ,सोने-चांदी व्यापारी लाईन, तळवेस, रिंग रोड व मुख्य रस्त्याने मोटारसायकल रॅली व पायी रॅली काढून आंदोलकांनी व्यापाऱ्यांना आपापली प्रतिष्ठाने, दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.
डोक्यावर भगवी टोपी, गळ्यात रुमाल घालून एक मराठा लाख मराठा, लढेंगे जितेंगे हम सब जरांगे, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देण्यात आल्या. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.
दरम्यान सर्व बसेस बंद झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. उदगीर बस स्थानक आगारातून दैनंदिन होणारे प्रवासी वाहतूक बसेस स्थानकातच थांबून उभ्या होत्या. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशावर व दररोज ये जा करणारे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक वर्ग यांच्यावर खाजगी गाड्यांनी प्रवास करण्याची वेळ आली होती. उदगीर तालुक्यात या बंदला कोणताही गालबोट लागलेला नाही. पोलीस बंदोबस्त चो ठेवण्यात आला होता.