विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना – डॉ. अर्चना मोरे

0
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना - डॉ. अर्चना मोरे

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना - डॉ. अर्चना मोरे

उदगीर (एल.पी.उगीले) : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा समृद्ध करण्यासाठी तसेच शारीरिक, बौद्धिक व भावनिक विकास घडवून आणून सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मौलिक योगदान आहे, असे मत डॉ. अर्चना मोरे यांनी व्यक्त केले. त्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय सेवा योजना दिन कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के हे होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाधिकारी डॉ. बंकट कांबळे यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. अर्चना मोरे म्हणाल्या, विद्यार्थ्यांना शारीरिक श्रमाची जाणीव व्हावी, तसेच आपला देह हा समाजसेवेसाठी झिजवावा, याकरिता राष्ट्रीय सेवा योजना विभाग बौद्धिक व शारीरिक श्रमाचे संस्कार करीत असतो. समाजाला समजून घेतल्याशिवाय समस्यामुक्त समाजाची निर्मिती होणार नाही. त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपस्थितांना केले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के म्हणाले, शारीरिक अवयव परमेश्वराची मौलिक देणगी आहे. त्याचा वापर समाजहितासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी करावा. कारण हात दुःखीतांचे अश्रू पुसण्यासाठी असतात. त्याचबरोबर हात हे समाज निर्मितीसाठी असतात, अशी भावना व्यक्त केली. राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे बिनभिंतीची शाळा असून ते महाविद्यालयाचे संस्कार केंद्र असते. राष्ट्रीय सेवा योजना तेजस्विता, तपस्विता, तत्परता या तीन तत्त्वांना जन्म घालणारा विभाग आहे. त्यामुळे सर्वांनी चारित्र्यसंपन्न होण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना विभागात सहभागी व्हावे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी डॉ. बालाजी होकरणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रियंका बाविस्कर या विद्यार्थिनीने तर आभार डॉ. निळकंठ वगशेट्टे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!