राष्ट्रीय सेवा योजना ही व्यक्तिमत्व विकासाची कार्यशाळा – डॉ. पांडुरंग चिलगर

0
राष्ट्रीय सेवा योजना ही व्यक्तिमत्व विकासाची कार्यशाळा - डॉ. पांडुरंग चिलगर

राष्ट्रीय सेवा योजना ही व्यक्तिमत्व विकासाची कार्यशाळा - डॉ. पांडुरंग चिलगर

अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राष्ट्र व समाजसेवेची संधी तर मिळतेच त्याचबरोबर व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, राष्ट्रीय सेवा योजना ही व्यक्तिमत्व विकासाची कार्यशाळा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी विभागीय समन्वयक व माजी कार्यक्रमाधिकारी तथा महात्मा फुले महाविद्यालयातील हिंदी विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन ‘ कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी हे होते तर किसानपीठावर नायब तहसीलदार मुनव्वर मुजावर , नायब तहसीलदार तुकाराम बनकर, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. बी. के. मोरे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. संतोष पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना डॉ. चिलगर म्हणाले की, महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सन 1969 ला राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना करण्यात आली. बदलत्या काळात भारतीय युवा पिढीला भारतीय संस्कृतीचे खरे दर्शन खेड्या मध्येच होईल तसेच ग्रामीण भागाचा विकास , राष्ट्रसेवा व समाजसेवा हा उद्देश समोर ठेवून राष्ट्रीय सेवा योजना कार्य करीत आहे, असे ही ते म्हणाले. यावेळी नायब तहसीलदार मुनव्वर मुजावर, नायब तहसीलदार तुकाराम बनकर यांनी ही मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या बोधचिन्ह व बोधवाक्यातून राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य स्पष्ट होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेमुळे आदर्श नागरिक घडतो आणि अशा नागरिकांची गरज सद्यस्थितीत समाजाला व राष्ट्राला आहे. यावेळी अर्थशास्त्र विभाग, तत्वज्ञान विभाग व संस्कृत विभागाच्या अभ्यास मंडळांनी तयार केलेल्या भित्ती पत्राकांचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बी.के. मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पिठाच्या अभ्यास केंद्राचे संयोजक प्रा. डॉ. अनिल मुंढे यांनी व आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!