संविधानाची मूलभूत माहिती सर्व सुजाण नागरिकांना व्हावी – इंजि. विश्वजीत गायकवाड
उदगीर (एल. पी. उगिले) : समाजामध्ये संविधानाबद्दल बऱ्याच काही चुकीच्या अफवा पसरवल्या जाऊ शकतात, दिशाभूल केली जाऊ शकते, हे लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत स्पष्ट जाणून आले आहे. त्या गोष्टी टाळून संविधानाची मूलभूत माहिती सर्वांना व्हावी, या उद्देशाने इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशनच्या मार्फत जनजागृतीचा एक भाग म्हणून गावोगावी संविधानाची प्रत वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनविलेल्या संविधानामध्ये प्रत्येक माणसाच्या मूलभूत अधिकारांमध्ये कोणालाही कसलाही बदल करता येत नाही. काही राजकारणी स्वार्थी लोक आपला राजकीय स्वार्थ साधावा म्हणून खोटा अपप्रचार करून घटना बदलणार असा अपप्रचार करत सुटले आहेत. जनतेची दिशाभूल करत आहेत. आपले कायमस्वरूपी अधिकार कोणते आहेत, ते का बदलता येत नाहीत? याबद्दल जनजागृती करण्याच्या हेतूने आम्ही गावोगावी संविधानाच्या प्रत वाटप करत आहोत, असे विचार इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वजीत गायकवाड यांनी व्यक्त केले. जनतेला सत्य कळावे. यासाठी प्रत्येक गावात संविधानाची प्रत भेट देण्यात येत आहे. याचा शुभारंभ जळकोट तालुक्यातील उमरदरा येथील सरपंच बालाजी गुट्टे यांना संविधानाची प्रत भेट देऊन करण्यात आला. सामान्य जनतेला मूळ राज्यघटना काय आहे? हे पाहायला मिळाले तर त्यांना आनंद होतो. प्रत्यक्षात त्याचे वाचन करण्यासाठी ते विकत घेणे सामान्य माणसाला शक्य नसते, त्यामुळे धूर्त व्यक्ती भारतीय संविधान बाबत खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करून स्वार्थ साधत असतात. खोट्या अपप्रचारापासून जनतेने सावध व्हावे आणि भारतीय संविधानामध्ये नेमके काय लिहिले आहे, याबद्दल माहिती व्हावी. याच उद्देशाने गावोगावी संविधानाचे प्रत भेट देण्यात येत असल्याचे इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले आहे.
चौकट
प्रत्यक्ष संविधान हातात आल्यानंतर गैरसमज होणे शक्य नाही – सरपंच बालाजी गुट्टे
सर्वसामान्य माणसाला कोणीही एखादी गोष्ट सांगितली तर ती चटकन पटायला लागते, अशीच अवस्था संविधानाबाबत ही झालेली आहे. मात्र आता इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांनी गावोगावी संविधानाची प्रत भेट देत असल्यामुळे संविधान नेमके काय आहे ? संविधानामध्ये आमच्या अधिकार काय आहेत? याची जाणीव आम्हाला होऊ लागली आहे. आता आम्हाला कोणीही संविधानाबद्दल खोटी माहिती सांगून दिशाभूल करू शकणार नाही. असा विश्वास सरपंच बालाजी रामराव गुट्टे यांनी व्यक्त केला आहे. तसेच या उपक्रमाबद्दल इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशनचे आभार ही व्यक्त केले आहेत.