महाविकास आघाडीच्या संवाद यात्रेत सहभागी व्हा – उषा कांबळे
महाविकास आघाडीच्या संवाद यात्रेत सहभागी व्हा - उषा कांबळे
उदगीर (प्रतिनिधी) : सध्या उदगीर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य माणूस अडचणीत सापडला आहे. त्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांचा विम्याचा प्रश्न असेल किंवा नुकसान भरपाईचा प्रश्न असेल, शासन किंवा लोकप्रतिनिधी याबाबतीत प्रचंड उदासीन आहेत. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. असे विचार काँग्रेस च्या नेत्या तथा प्रदेश सरचिटणीस उषाताई कांबळे यांनी प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना सांगितले. समाजामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, काही गुंतागुंतीचे होत चालले आहेत.
भाजप सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. भाजप सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे आज प्रचंड बेकारी वाढली आहे. सुशिक्षित झालेले तरुण नोकरी शोधत भटकत फिरत आहेत. रोजगारासाठी वणवण फिरत असताना स्थलांतर करत आहेत. ही सरकारच्या दृष्टीने शरमेने मान खाली घालावी अशी आहे. मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला याचे काहीच देणे घेणे नाही. संवेदना हरवलेल्या या सरकारने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जो निधी राखीव करून ठेवला होता तो देखील आता रद्द करण्याचा शासन निर्णय काढलाय, यापेक्षा या शासनाची असंवेदनशीलता काय असू शकते? असा प्रश्नही उषाताई कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
यासोबतच समाजामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून नागरिकाच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडी जनतेच्या दारी संवाद यात्रा दिनांक 3 ऑक्टोबर पासून मतदार संघात सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ते आणि नेत्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीच्या नंतर उषाताई कांबळे प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होत्या.
या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये प्राधान्याने माजी आ. सुधाकरराव भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याणराव पाटील, जळकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारुती पांडे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती प्रीती चंद्रशेखर भोसले, शहर काँग्रेसचे अध्यक्ष मंजूर खान पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते चंदन पाटील नागराळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. डॉ. शिवाजीराव मुळे, ज्येष्ठ समाजवादी नेते रंगा राचुरे , विधीज्ञ पद्माकर उगिले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, काँग्रेसचे नेते शिवाजीराव हूडे यांच्यासह उदगीर आणि जळकोट तालुक्यातून अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
या संवाद यात्रेच्या निमित्ताने बोलताना उषाताई कांबळे म्हणाल्या की, उदगीर विधानसभा मतदारसंघात विकासाचा आभास निर्माण केला जातो आहे. वास्तविक पाहता वाढलेली प्रचंड बेकारी, बेरोजगारी आणि हाताला काम नाही. अशी परिस्थिती हे सर्व सरकारचे अपयश आहे. गुत्तेदार आणि दलाल पोसून विकास झाला म्हणून सांगणे चुकीचे आहे. शाश्वत विकासाची गरज उदगीर विधानसभा मतदारसंघाला आहे. जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण जनतेच्या दारापर्यंत गेले पाहिजे ही भूमिका महाविकास आघाडीची निर्माण झाल्यामुळे आम्ही या यात्रेसाठी निघालो आहोत. आपणही सहभागी व्हावे, सर्वच संवेदनशील माणसांनी याबाबतीत गांभीर्याने विचार करून सर्वसामान्य माणसाला मदत करण्याच्या भूमिकेतून महाविकास आघाडीची जोडले जावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले आहे.
