रेबीज़ या प्राणघातक रोगाचे समूळ उच्चाटन करणे साठी सामुहीक प्रयत्नांची आवश्यकता – डॉ अनिल भिकाने
माफसुचे रौप्य महोत्सवानिमित्त जानापूर येथे ‘जागतिक रेबीज दिन’ साजरा करून रेबिजद्वारे शून्य मृत्यू या अभियानास प्रारंभ
उदगीर (प्रतिनिधी) : रेबीज या प्राणघातक विषाणूजन्य रोगाचे सन २०३० पर्यंत जगातुन समुळ उच्चाटन करणेसाठी सामुहीक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यानी केले. ते महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर मार्फत चंगळामाता प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रमशाळा, जानापूर येथे ‘जागतिक रेबीज दिनाचे औचित्य साधून आयोजित रेबीज जनजागृती अभियाना अंतर्गत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी भूषविले तर मंचावर चंगळामाता उच्चमाध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक बिरादार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बस्वराज पाटील , पर्यवेक्षक किशोर अचवले , उन्नत भारत अभियान योजनेचे समन्वयक डॉ. प्रशांत मसारे , डॉ विलास डोंगरे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, रेबीजमुळे दरवर्षी ५९ हजार लोकांचा मृत्यु होतो, त्यातील सर्वाधिक २० हजार म्हणजे ३६ टक्के लोकांचा मृत्यु भारतात होतात.यातील ४० टक्के मृत्यु हे १५ वर्षाखालील मुलांत होतात. त्यामुळे या रोगाचे निर्मुलन करावयाचे असेल तर शाळकरी विद्यार्थ्यात श्वानंदंशा बद्दल जागृती करणे हे गरजेचे आहे . श्वानदंश टाळणेसाठी श्वानाची मानसिकता जाणून घ्या ,पळू नका , ओरडू नका किंवा श्वानावर कांही फेकू नका , झोपलेल्या ,अन्न खात असलेल्या किंवा पिलाची काळजी घेणाऱ्या श्वानास त्रास देवू नका , गुरगुरणारा श्वान जवळ आल्यावर पळू नका ,स्थिर उभे रहा , आपले हाथ खाली शरीराजवळ ठेवा , जमिनिकडे पहा श्वानाकडे थेट बघू नका असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्याना दिला. रेबीज झाल्यानंतर मृत्यु अटळ असतो, परंतू श्वानदंश झाल्यावर तात्काळ प्रभावि उपाय योजना केल्यास १०० टक्के रोग टाळता येतो . शिक्षक व विद्यार्थ्यांनी रेबीज या आजाराविषयी शास्त्रीय दृष्टीकोन ठेवून आपल्या कुटुंब व गावामध्ये रेबीजबद्दल जनजागृती करून या आजाराचे निर्मुलन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही डॉ. भिकाने यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रविंद्र जाधव तर आभार प्रदर्शन डॉ. विलास डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, पशुवैद्यक महाविद्यालयाचे अंतिम वर्ष विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शाळेतील ४०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.