अहमदपूर खुन प्रकरण ; तितर पक्षी विकून दिवसा करायचे रेकी, मध्यरात्री साथीदारांसह टाकायचे दरोडा
अहमदपूर खून प्रकरणात संशयिताची कबुली, बुलडाण्यातील बरटाळा येथील एकास अटक
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा शिवारातील आखाड्यावर दरोडा पडल्याची घटना १५ सप्टेंबरला मध्यरात्री घडली होती. या घटनेत दरोडेखोरांनी शेतात झोपलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा खून केला, तर ६५ वर्षांच्या वृद्ध महिलेला गंभीर जखमी केले होते. १५ दिवसांत या गुन्ह्याचा उलगडा करून संशयिताला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. मुख्य आरोपी गणेश पवार याला पोलिसांनी अटक केली. दिवसा तितर विकून रेकी करायची आणि रात्री दरोडा घालायचा, अशी गुन्ह्याची पद्धत असल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले.
या संशयिताने अन्य पाच साथीदारांच्या मदतीने वाशिम जिल्ह्यातही दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. लातूर जिल्ह्यातील अन्य – चार घरफोड्यांमध्ये याच टोळीचा – सहभाग असल्याचे समोर आले – आहे. अहमदपूर तालुक्यातील रुद्धा येथील शेतातील आखाड्यावर – दरोडेखोरांनी १५ सप्टेंबरच्या मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास दरोडा टाकला होता. प्रतिकार केल्याने दरोडेखोरांनी रावसाहेब केंद्रे यांचा खून करून, उषाबाई केंद्रे यांना गंभीर जखमी – केले होते. त्यानंतर ७ ग्रॅम सोने चोरुन – दरोडेखोर फरार झाले होते. लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याची – उकल केली. याप्रकरणी दरोड्यातील – मुख्य आरोपी गणेश ऊर्फ गंगण्या अंजीर पवार (२२, रा. बरटाळा, – ता. मेहकर, जि. बुलडाणा) याला अटक केली आहे. त्याला ताब्यात – घेताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. – दरोडा टाकताना अमोल परात्या भोसले, जेऱ्या उर्फ जरु परात्या भोसले (दोघे रा. बरटाळा ता. मेहकर, जि. बुलडाणा), चुमा सत्तर भोसले, कपुऱ्या सत्तर भोसले (दोघे रा. लोणी लव्हार, ता. चिखली, जि. बुलडाणा), राहुल श्रीरंग पवार (रा. उकळी, ता. मेहकर जि. बुलडाणा) हे पाच साथीदार सोबत असल्याची कबुल दिली आहे. त्यांच्या शोधासाठी एक पथक बुलडाण्याकडे रवाना झाले.
उलटी कुऱ्हाड डोक्यात घातली :
रुद्धा शिवारात दरोडा टाकण्यापूर्वी दिवसा या आखाड्याची रेकी केली होती. दरोडा टाकण्यापूर्वी या सहा जणांनी दारू ढोसली. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची ७ ग्रॅम सोन्याची पाने तोडून घेत असताना त्यांनी विरोध केला. त्यामुळे दरोडेखोरांनी हातातील उलट्या कुऱ्हाडीचा घाव त्यांच्या डोक्यात घातला. त्यामुळे रावसाहेब केंद्रे जागीच ठार झाले.
अशी होती दरोड्याची पद्धत
बुलडाणा जिल्ह्यातील आरोपी काही दिवसांपूर्वी अहमदपूर शहराजवळील माळेगाव येथे मुक्कामी आले होते. जंगलांमध्ये तितर पक्षी पकडल्यानंतर ते विकण्यासाठी शहरांसह परिसरातील शेतशिवारात जाऊन ते रेकी करायचे. दिवसभर रेकी केल्यानंतर सावज हेरायचे. नंतर रात्री टोळीने जाऊन दरोडा टाकायचे. वाशिमसह लातूर जिल्हातील अहमदपूर, चाकूर, जळकोट परिसरातही चार घरफोड्या केल्याची कबुली संशयिताने दिली आहे.