डिजीटल मार्केटिंगमध्ये उत्तम करिअर – कु.ऐश्वर्या राजेंद्र वाडीयार
उदगीर (प्रतिनिधी) : स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागतेच असेही नाही. कमी गुंतवणूक करून देखील आजच्या या युगात डिजीटल मार्केटिंगच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभ राहता येते. विद्यार्थ्याकडे असलेल्या कल्पकतेला व कौशल्याला तंत्रज्ञानाची जोड असेल, तर डिजीटल मार्केटिंगमध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना उत्तम करिअर करता येते, असे विचार कु.ऐश्वर्या राजेंद्र वाडीयार यांनी व्यक्त केले.
श्री हावगीस्वामी महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्यावतीने वाणिज्य विषयातील करिअरच्या संधी या विषयावर इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील ॲस्टन विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स अंतर्गत इंटरनॅशनल बिझनेसमध्ये पदवी अभ्यासक्रम प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या कु.ऐश्वर्या राजेंद्र वाडीयार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे तर मंचावर भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे , ॲड.गौरव वाडीयार तसेच वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ.एम.बी.कातकडे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एम. बी. कातकडे तर पाहुण्यांचा परिचय डॉ. म. ई. तंगावार यांनी करून दिला.
पुढे बोलताना कु.ऐश्वर्या वाडीयार म्हणाल्या, सध्याच्या संगणकाच्या काळात आता आम्ही ग्रामीण भागात राहतोय.शिक्षण व नोकरी करण्यासाठी संधी कुठे आहे? असे म्हणता येणार नाही. कारण इंटरनेटची सोय झालेली असल्यामुळे आपल्याला अनेक सर्टिफिकेट कोर्स ऑनलाईन माध्यमातून करता येतात. विविध आधुनिक माध्यमांचा वापर व्यवसायासाठी करून आपल्या करिअरला आकार देता येतो.
यावेळी ॲड.गौरव वाडीयार यांनी डिजिटल मार्केटिंग आणि जाहिरातीचा थोडा अनुभव असेल तर रोजगाराच्या अनेक संधी आहेत. नव्हे तर या माध्यमातून मोठे उद्योजक तयार होतील असेही म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए.ए.काळगापुरे म्हणाले, वाणिज्य शाखा ही अनेकांना रोजगार देते. वाणिज्य शाखेतील विद्यार्थी सहसा रिकामे राहत नाहीत.अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने सदरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदीने प्रयत्न केले. या कार्यक्रमाचा लाभ वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.श्वेता हुनसनाले तर आभार डॉ.सूचिता पाटील यांनी मानले.