एआय हे तंत्रज्ञान उच्च शिक्षणातील आव्हान आहे – डॉ. एन. टी. कांबळे

0
एआय हे तंत्रज्ञान उच्च शिक्षणातील आव्हान आहे - डॉ. एन. टी. कांबळे

एआय हे तंत्रज्ञान उच्च शिक्षणातील आव्हान आहे - डॉ. एन. टी. कांबळे

अहमदपूर (गोविंद काळे) : आजच्या काळात बुद्धिमत्तेचा आधार न घेता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर वेळेची, पैशाची आणि श्रमाची बचत करून कार्य केले जात आहे. यामुळे समाजात निष्क्रियता वाढत असून हे उच्च शिक्षणातील फार मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे सदस्य डॉ. एन. टी. कांबळे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात ‘उच्च शिक्षण आणि संशोधनात सृजनशील कृत्रिम बुद्धिमत्ता: संधी आणि आव्हाने ‘ अर्थात ‘जनरेटिव्ह ‘एआय’ इन हायर एज्युकेशन अँड रिसर्च: अपॉर्च्युनिटीज अँड चॅलेंजेस’ या विषयावर आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय आंतर विद्याशाखीय चर्चासत्राच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे उपाध्यक्ष माधवराव पाटील हे होते तर कार्यकारी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य ज्ञानदेव झोडगे गुरूजी, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्यासह डॉ. राजश्री जाधव, संयोजक डॉ. बी.के.मोरे, सहसंयोजक डॉ. सतीश ससाणे आदींची किसान पीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना डॉ. एन. टी. कांबळे म्हणाले की, संशोधकांनी आपले संशोधन दर्जेदार पद्धतीचे करावे परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून संशोधन कार्यातील मधला मार्ग शोधण्याचा प्रयत्न संशोधक करीत असताना दिसून येतात. कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य पद्धतीने उपयोग करून संशोधनाचे फायदे व तोटे ही सांगितले पाहिजेत तरच त्याचा समाजाला व राष्ट्राला निश्चित फायदा होईल, असेही ते म्हणाले.
या समारोप कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माधवराव पाटील यांनी केला. तर डॉ. राजश्री जाधव व नळेगाव येथील डॉ. बालाजी डिगोळे यांनी राष्ट्रीय चर्चासत्रा संबंधित मनोगत व्यक्त केले.
या राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागातील प्रा. के. आर. कदम यांनी केले तर आभार सह -संयोजक डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!