पालकांनी पाल्याच्या अडचणी समजून घेणे काळाची गरज – प्रदीप नणंदकर

0
पालकांनी पाल्याच्या अडचणी समजून घेणे काळाची गरज - प्रदीप नणंदकर

पालकांनी पाल्याच्या अडचणी समजून घेणे काळाची गरज - प्रदीप नणंदकर

उदगीर (प्रतिनिधी) : आजच्या मोबाईलच्या काळात पालक व पाल्यांमधील संवाद कुठेतरी हरवत चालला असून आपली भावी पिढी प्रगल्भ बनविण्यासाठी पालकांनी पाल्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडविणे ही काळाची गरज आहे. असे मत लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर यांनी व्यक्त केले.
येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील प्रा. डॉ. गौरव जेवळीकर लिखित ‘भावी पिढ्यांशी बोलतो आम्ही’ या पुस्तकाचे व प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार संपादित वृंदा दिवाण यांच्या निवडक कथांचा ‘कथांजली’ या पुस्तकाचे प्रकाशन व अक्षरमुद्रा प्रकाशनाचा शुभारंभ ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नणंदकर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. मनोहर पटवारी होते. व्यासपीठावर मसापचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामचंद्र तिरुके, नांदेड येथील कथाकार शंकर विभूते, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, डॉ. श्रीकांत मध्वरे, डॉ. संजय कुलकर्णी, धनंजय गुडसुरकर यांची उपस्थिती होती.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. गुरुवारी डॉ. ना. य. डोळे यांचा स्मृतिदिन होता.रतन टाटा यांचे निधन झाल्याने दोघानांही आदरांजली वाहण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा जाहीर केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यात आले.
पुढे बोलताना प्रदीप नणंदकर यांनी भावी पिढ्याशी प्राध्यापकाला बोलावे वाटले हे समाधानकारकच म्हणावे लागेल. प्राध्यापकाबद्दल व शिक्षक यांच्याबद्दल समाजात चांगली प्रतिमा राहिली नाही, याची खंत व्यक्त करून ना. य. डोळे सरांचा वारसा येथील प्राध्यापक चालवीत आहेत, याचेही समाधान वाटत असल्याचे नणंदकर म्हणाले. आजच्या काळात वाचन संस्कृती कमी होत असताना प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांच्या पुस्तकातून नव्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे. या पुस्तकातील लेखांमधून डॉ. जेवळीकर यांनी प्रत्येकाला स्वतःबद्दलचा विचार करायला लावणारे लेख प्रकाशित केले आहेत. पालकांची पाल्यासाठी आज होत असलेली धडपड आज कुठेतरी चुकते आहे का? याचे चिंतनही या पुस्तकातून होत असल्याचे मत ननंदकर यांनी व्यक्त केले. पालकच आपल्या मुलांना बिघडवत आहेत. अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. आईवडिलांकडून मुलांवर योग्य ते संस्कार होत नाहीत, अशी खंत व्यक्त करून प्रत्येक पालकाने घरी चर्चा केली पाहिजे. व आपल्या पुढील पिढीला समजावून सांगितले पाहिजे. मुलांच्या भावना समजून घेऊन त्यांच्या मनातील प्रश्न सोडवण्यासाठी पालकांनी प्रयत्न करणे काळाची गरज आहे. पाल्यांच्या चूका पालकांनी सांगण्याचे धाडस केले पाहिजे असेही नणंदकर यावेळी म्हणाले.
यावेळी कथाकार प्रा. शंकर विभूते यांनी डॉ. चिद्दरवार यांनी कथांजली निर्माण करताना नावीन्य जपले आहे. कल्पकता जपण्याचे काम केले असल्याचे सांगून वृंदा दिवाण यांच्या निवडक दहा कथा घेऊन चिद्दरवार यांनी सामाजिक भान जपण्याचे काम केले. मानवी मनाचे विश्लेषण करणाऱ्या कथा निवडून संपादित केलेल्या या कथासंग्रहातून नात्यांची गुंतागुंत सोडवण्याचे काम केले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे मत यावेळी कथाकार प्रा. विभूते यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात माजी आमदार प्रा. मनोहर पटवारी यांनी स्व. डोळे सरांच्या माध्यमातून चळवळीत आपण संघर्ष केला असल्याचे मत व्यक्त केले.
प्रास्ताविक डॉ. दीपक चिद्दरवार यांनी केले. सुत्रसंचालन ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांनी केले. आभार प्रा. प्रवीण जाहुरे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!