आमदार बाबासाहेब पाटील यांचा शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल
अहमदपूर (गोविंद काळे) : महायुतीचे उमेदवार आमदार बाबासाहेब पाटील यांनी सोमवार (ता. 28 ) रोजी मोठ्या शक्ती प्रदर्शनासह फेरी काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला व फेरीचे निजवंते नगर येथे जाहीर सभेमध्ये रूपांतर झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव होते तर व्यासपीठावर नामदार धनंजय मुंडे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आमदार विक्रम काळे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ माने, रिपाईचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांची उपस्थिती होती.
जाहीर सभेत बोलताना नामदार धनंजय मुंडे म्हणाले महायुती सरकारने मागील काळात महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी विविध योजना आणल्या असून या योजना पुढील काळात चालू राहण्यासाठी महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे. सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या व विकासाची हातोटी असलेल्या आमदार बाबासाहेब पाटील यांना मतदान करावे असे आव्हान करतानाच त्यांनी आमदार पाटील यांना तिसऱ्यांदा निवडून द्या अशी कळकळीची विनंती केली. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले काम ही माझी जात असून मतदारसंघासाठी मी मागील पाच वर्षाच्या काळात अडीच हजार कोटीची कामे केली आहेत. अहमदपूर चाकूर शहरात प्रशासकीय इमारत करून नागरिकांची कामे सोपी केली असून अहमदपूर व चाकूर शहरातील एमआयडीसी पूर्णत्वाकडे घेऊन जाणार आहे. भविष्यामध्ये मला सिंचनासाठी अंतेश्वर बांधाऱ्यातून चाकूर अहमदपूर तालुक्यासाठी पाणी उपलब्ध करावयाचे असून यातून 25 हजार एकर जमीन भिजवण्याचा संकल्प आहे. यासोबतच तालुक्यामध्ये शिक्षणासाठी सर्व समाजासाठी अध्यायवत अशा शैक्षणिक संकुलनासाठी पोषक वातावरण बनवायचे आहे. आम्ही जातीपातीचे राजकारण करत नसून अठरापगड जातीला घेऊन समाजाची उन्नती करण्याकडे प्रयत्नशील राहतो. शैक्षणिक संकुले, बँक, साखर कारखाना, दुग्ध व्यवसाय यामधून अनेकांच्या हाताला रोजगार देण्याचे काम केलं आहे. मागील काळात मी काम केलं असं वाटलं तर मला मतदान करा असेही आमदार पाटील यावेळी म्हणाले. या वेळी सभापती मंचकराव पाटील, महिला जिल्हाध्यक्षा मीनाक्षी शिंगडे, अशोक केंद्रे, माजी नगराध्यक्ष अश्विनी कासनाळे, शाहू कांबळे, अनुराधा नळेगावकर, सुप्रिया भालेराव मिलिंद महालिंगे, सुरज पाटील, शिवाजी देशमुख, शिवाजी काळे, राजकुमार मजगे, अजहर बागवान, शिवाजी खांडेकर, अभय मिरकले, सुप्रिय बनसोडे, ॲड.टी.एन.कांबळे, सरपंच सूर्यकांत चव्हाण, अमित रेड्डी, निखील कासनाळे, आशिष तोगरे, राम नरवटे, बाळासाहेब लखनगीरे यांची उपस्थिती होती.