विधानसभा निवडणूक मतदानासाठी उरले अवघे 72 तास. लातूर पोलीस ॲक्शन मोडवर
लातूर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका 2024 निर्विघ्नपणे व खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यासाठी लातूर पोलिसांनी सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध उपाय योजना सुरू केल्या आहेत. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात काटेकोरपणे अंमलबजावणीही करण्यात येत आहे.
विधानसभा मतदान प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून सदर प्रक्रियेस अवघे 72 तास शिल्लक असून लातूर पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. लातूर पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार आहेत. यामध्ये रोज रात्री सतर्क पेट्रोलिंग व ऑल आऊट, कोंबिंग ऑपरेशन राबविणे.प्रत्येक वाहनांची बारकाईने कसून तपासणी व चौकशी करणे.देशी, विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय, वाहतूक,साठेबाजी होणार नाही याची काळजी घेऊन याआधी गुन्हे दाखल झालेल्यावर विशेष लक्ष ठेवून कारवाई करणे. रोख रकमेची संशयास्पद देवाण-घेवाण , ट्रांजेक्शन व इतर व्यवहाराची माहिती काढून कार्यवाही करणे.सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे त्यांच्या संशयास्पद हालचाली निदर्शनास येताच कडक कारवाई करणे.अवैध शस्त्रांचा शोध घेऊन अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करणे.आंतरराज्य सीमेवर असणारे चेकिंग पॉईंट अधिकाधिक कार्यक्षम करून संशयास्पद वस्तूंची देवाण-घेवाण होणार नाही याची दक्षता घेणे.
विधानसभा निवडणूक कर्तव्यासाठी उपलब्ध झालेल्या केंद्रीय पोलीस दलातील व होमगार्ड यांचा जास्तीत जास्त उपयोग करून प्रभावी कार्यवाही करणे.कर्नाटक राज्यातून लातूर जिल्ह्यात येणाऱ्या चोर वाटावर लक्ष ठेवून तेथे अचानकपणे नाकाबंदी करून सदर मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांना थांबवून बारकाईने सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
तसेच सीमा वरती भागात असलेल्या संवेदनशील गावावर विशेष लक्ष ठेवून प्रभारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक गाव भेटी परिस्थितीची माहिती करून घेणे व तात्काळ प्रभावी उपाययोजना करणे.लातूर जिल्हास जोडलेल्या सर्व आंतरराज्य तपासणी नाकावरती निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आले आहेत.
लातूर पोलीस सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीशी संबंधित प्रचार व आक्षेपार्ह घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रक्षेपित करणारे लोकांवर नजर ठेवून कारवाई करण्यात येत आहे.राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या गावांमध्ये शक्ती प्रदर्शन करीत रोड मार्च करण्यात येणार असून संवेदनशील ठिकाणचे ड्रोन द्वारे निगराणी करून अप्रिय घटना घडणार नाहीत व सदरच्या निवडणुका, मतमोजणी निर्विघ्नपणे पार पडेल याची दक्षता घेण्यात येणार आहे.