भूमीपुत्र आमदार पाहिजे की प्रवासी ? सुधाकर भालेरावांचा जनतेला प्रश्न
भूमीपुत्र आमदार पाहिजे की प्रवासी ? सुधाकर भालेरावांचा जनतेला प्रश्न
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर संग्राम भालेराव यांनी मतदारसंघात प्रचार रॅली, संवाद बैठका घेऊन मतदारसंघ पिंजून काढत आहेत. सुधाकर भालेराव यांच्या समर्थनार्थ येलम (रेड्डी) समाज बांधवांची संवाद बैठक उदगीर शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात पार पडली. ‘कहो दिल से, भालेराव फिरसे’ ही टॅगलाईन घोषणाबाजी देत रेड्डी समाज बांधवांनी सुधाकर भालेराव यांना जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी बोलताना सुधाकर भालेराव म्हणाले, मागील पाच वर्षात उदगीर विधानसभा मतदारसंघात विकासाच्या नावाखाली प्रचंड मोठी लूट झाली आहे. विकास केल्याची फक्त हवा करून सामान्य जनतेची फसवणूक करण्याचे काम उदगीरच्या विद्यमान आमदाराने केले. मागील पाच वर्षांत उदगीर, जळकोट तालुक्यांतील एकही शेतकऱ्याला पीकविमा मिळाला नाही, एकाही तरुणाला रोजगाराची कोणतीही संधी इथल्या आमदाराने उपलब्ध करून दिली नाही. बाहेरून येवून व्यापारी दृष्टिकोनातून जनतेला खोटी आश्वासने देवून लूट करण्याचे पाप सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे लातूरचे पार्सल लातूरला पाठवून भूमिपुत्राला साथ द्या, असे आवाहन सुधाकर भालेराव यानी केले आहे.
