क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले: सौ.शिल्पा बनसोडे
उदगीर (प्रतिनिधी) : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार संजय बनसोडे यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात उदगीर मतदार संघात कोट्यावधी रुपयाचा विकास निधी खेचुन आणून उदगीरचा कायापालट केला. केवळ विकास कामे करून ते थांबले नाहीत तर सामान्य जनतेशी ते कायम संपर्क ठेवून जनतेतला मंत्री म्हणून त्यांनी आपली ओळख संबंध महाराष्ट्रात निर्माण केली. गेल्या तीस वर्षाच्या त्यांच्या राजकीय जीवनात त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले असल्याचे मत सौ.शिल्पा संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
त्या उदगीर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या प्रचारार्थ उदगीर व जळकोट येथील महिला मेळाव्यात महिलांशी संवाद साधताना बोलत होत्या. यावेळी रेश्मा बनसोडे, शारदा बनसोडे, अनिता हैबतपुरे, ललिता शेंदकर,सुनिता चव्हाण , नूतन केंद्रे, डाॅ.कल्पना किनीकर, सुमन कलंत्री, ममता सोनकांबळे, दिपाली औटे डॉ.रेखा रेड्डी, आशाताई रेड्डी, कांताबाई कलबुर्गे, शोभाताई केंद्रे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना सौ.शिल्पा बनसोडे यांनी, गेली पाच वर्ष उदगीर मतदार संघाची अविरत पणे सेवा करणारे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी तळागाळातील जनतेच्या दारापर्यंत विकासाची गंगा पोहोचवली मतदारसंघाला आपले कुटुंब समजून रात्रंदिवस सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारे जनतेतले व सर्वसामान्यांचे नेतृत्व असलेले क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना निवडून द्यावे. असे आवाहन शिल्पा बनसोडे यांनी केले.
ना.बनसोडे यांनी, मागील ५ वर्षाच्या काळात सामान्य जनतेच्या हितासाठी झपाटून काम केले आहेत. विविध योजना सर्वसामान्यांच्या दारी पोहचवल्या. महिलांना स्वबळावर उभे राहावे यासाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली. त्या योजनेची सर्वधिक नोंदणी ही आपल्या मतदार संघातून ना.बनसोडे यांनी केली. शेतकऱ्यांसाठी अनेक क्रांतिकारी योजनांचे निर्णय घेतले. त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात महायुतीच्या सरकारबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. उदगीरच्या विकासासाठी आपण सर्वांनी ना.संजय बनसोडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन सौ.शिल्पा बनसोडे यांनी केले आहे.
यावेळी उदगीर शहरातील विविध प्रभागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.