शास्त्री प्राथमिक शाळेत अपार आयडी संदर्भात पालक मेळावा संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्या सूचनेनुसार लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात,अपार आयडी संदर्भात मार्गदर्शन पालक मेळावा मोठ्या संख्येने उत्साहात संपन्न झाला.
या पालक मेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, प्रमुख पाहुणे म्हणून माधव केंद्रे, विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी तसेच,विशेष उपस्थिती म्हणून शाळेचे पालक खंदाडे मंचावर उपस्थित होते.
पालक मेळाव्याच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती,तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पालक मेळाव्याचे प्रमुख पाहुणे माधव केंद्रे यांनी अपार आयडी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, हे कार्ड आता देशातील नागरिकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. वन नेशन वन स्टुडन्ट या संकल्पनेवर हे कार्ड तयार होत आहे.येत्या काळात मुलांना हे कार्ड विविध शाळेतील प्रवेशापासून ते नोकरी लागेपर्यंत उपयोगी ठरणार आहे.केंद्र सरकारने या कार्डचे नाव अपार आयडी कार्ड असे ठेवले आहे. म्हणजेच ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री.या अपार आयडीचे फायदे काय आहेत हे सांगितले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एकत्रित जतन करून ठेवण्यासाठी या आयडी चा उपयोग होणार आहे.अशी सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय समारोपात अंकुश मिरगुडे यांनी विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश झाल्यावर कोणकोणत्या पद्धतीने विद्यार्थी राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय लॉगिनला जोडला जातो हे सांगितले. तसेच,पालकांनी विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतेवेळी अचूक कागदपत्र द्यायला हवीत असे सांगितले. अपार आयडी देशभरातील विद्यार्थ्यांची युनिक ओळख होणार आहे. आधार कार्ड प्रमाणे १२ अंकी युनिक क्रमांक असेल.हा आयडी कोणत्याही विद्यार्थ्यांना नर्सरी,शाळा वा महाविद्यालयात प्रवेश घेताच मिळेल असे सांगितले.
यानंतर काही पालक बंधू भगिनींनी आपल्या मनात असणाऱ्या शंका,अडचणी, प्रश्न मुख्याध्यापकांना विचारल्या व त्या सर्व प्रश्नांची समाधान पालकांना मिळाले.पालक मेळाव्यासाठी पालक बंधू- भगिनींची उपस्थिती होती.